नागपूर (Nagpur) : नागपूर-नागभीड रेल्वे ब्रॉडगेजच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या शेतातील मुरूम अवैधरीत्या खोदून काढल्याने विना रॉयल्टी, विना परवाना कोट्यवधी रुपयांचा सरकारच्या महसुलाची चोरी केली आहे. कंत्राटदाराने हे खोदकाम केलेले खड्डे बुजवायचे होते, परंतू तसे न करता पोबारा केला. त्यामुळे शेतात तळे निर्माण झाले. त्याचा फटका लगतच्या शेतकऱ्याला बसून शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन असलेली शेती उत्खननामध्ये खचून गेल्याने ती फक्त कागदाच्या सातबाऱ्यापुरती मर्यादीत राहिली आहे. त्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शेतजमीन चोरी झाल्याची तक्रार सरपंच विजय खोडके यांच्यासह शेतकऱ्यांनी केली.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिकेत शहाणे यांनी पीडित शेतकऱ्याला न्याय न मिळाल्यास शेतकऱ्याला घेऊन बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मागील दोन वर्षांपासून नागपूर नागभीड दक्षिण पूर्व मध्य रेल्वे लाईनच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. या कामाच्या काही भागाचे कंत्राट एका खासगी कंपनीकडे होते. खासगी कंपनीने तालुक्यातील आडका या शिवारातील दोन शेतकऱ्यांच्या जमिनी बाजारभावाने खरेदी केल्या. नागपूर-नागभीड रेल्वे ब्रॉडगेजच्या कामासाठी शेतातील मुरूम 70 ते 80 फूट अवैधरीत्या खोदून काढल्याने बिना रॉयल्टी, बिना परवाना कोट्यवधी रुपयांचा सरकारच्या महसुलाची चोरी केली आहे. कंत्राटदाराने हे खोदकाम केलेले खड्डे बुजवायचे होते. परंतू तसे न करता पोबारा केला. त्यामुळे शेतात तळे निर्माण झाले. त्याचा फटका लगतच्या असलेल्या पुरुषोत्तम खोडके या शेतकऱ्याला बसला. शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन असलेली शेती उत्खननामध्ये खचून गेल्याने ती फक्त कागदाच्या सातबाऱ्यापूर्ति मर्यादित राहिली आहे.
अवैधरीत्या उत्खनन केल्याने पुरूषोत्तम खोडके या शेतकऱ्याचे नुकसान झाले असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची असून या कंत्राटदारावर नोटीस बजावून 64 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्याबाहेरील असलेल्या या कंत्राटदारावर कारवाई करण्याकरिता रेल्वेच्या संबंधीत विभागाने त्याची आर्थिक गोची करून कारवाई करण्यात सहकार्य करावे. अशी माहिती तहसीलदार अक्षय पोयाम यांनी दिली. कृषी उत्पन्न बाजार समिती, कामठी चे सभापती अनिकेत शहाणे यांनी सांगितले की आडका येथील अल्पभूधारक शेतकरी पुरूषोत्तम खोडके यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेली शेती नष्ट झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. दोन मुले सोडून निघून गेल्याने संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. याला जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पीडित शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा.
आत्महत्येचा इशारा
शेतीवर आमची उपजीविका असून कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेतजमीन पूर्ववत करून न दिल्यास आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसल्याचा इशारा पीडित पुरूषोत्तम खोडके यांनी दिला आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.