Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : आता पोहरा नदी होणार 'स्वच्छ' आणि 'सुंदर'; निघाले 810 कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : शहरातील प्रमुख नदी असणाऱ्या पोहरा नदीचा चेहरा-मोहरा पुढील दोन वर्षात बदलणार आहे, याकरिता नागपूर महापालिकेने पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या सहकार्याने 810 कोटींच्या टेंडर प्रक्रियेला सुरुवात केली आहे. येत्या 2 वर्षाच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा व पोहरा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा नागपूर महापालिकेचा मानस आहे.

अमृत-2.0 योजने अंतर्गत नदी स्वच्छता अभियान :

नागपूर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात शहरात नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. अशात केंद्र शासन पुरस्कृत अमृत-2.0 योजने अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागामार्फत नागपूर शहरातील साऊथ सिवरेज झोन व हुडकेश्वर आणि नरसाळा करीता सांडपाणी संकलन प्रणालीचा विकास व प्रक्रिया बाबतचा “पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प (Pollution Abatement of Pohra River Project) राबविण्यात येत आहे.

अशाप्रकारे केला जाणार खर्च : 

या प्रकल्पाकरीता 5 पॅकेजमध्ये विभागणी करुन एकूण 810.28 कोटींचे टेंडर तयार करण्यात आलेल्या आहेत. यात पॅकेज-1- 45 द.ल.लि. सांडपाणी प्रक्रिया केंद्र, पंपिंग स्टेशन, वेट वेल, पंपिंग मेनसाठी राशी रु. 109.29 कोटी, पँकेज-2 – सिवरेज सबझोन 1 साठी रु. 175.40 कोटी, पँकेज-3, सिवरेज सबझोन-2 व 3 साठी रु. 254.63 कोटी, पॅकेज - 4, सिवरेज सबझोन 4 साठी रु. 115.50 कोटी, पॅकेज-5, हुडकेश्वर व नरसाळासाठी 155.46 कोटी असा खर्च अपेक्षित आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत-2.0 अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनामार्फत अनुज्ञेय अनुदान 25 टक्के, राज्यशासन अनुज्ञेय अनुदान 25 टक्के महापालिकेला प्राप्त होणार आहे यात नागपूर महापालिकेचा 50 टक्के हिस्सा राहणार आहे.

या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल (DPR) जीएसटी 957.01 कोटी चा आहे.  मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, नागपूर यांनी दिलेल्या तांत्रिक मान्यतेनुसार त्यास राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत मान्यता दिलेली आहे.यासंबंधित नमुद पॅकेज करीता आँनलाईन निविदा शासनाचे महाटेंडर वेबसाईट www.mahatenders.gov.in वर 11 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.