Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेची आयडिया; 'इन्स्टा रोड पॅचर'चा करणार वापर

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : पावसाळ्यात डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. हे खड्डे कमी वेळेत जलद प्रभावाने बुजविता यावेत यादृष्टीने नागपूर महापालिकेच्यावतीने इन्स्टा रोड पॅचर मशीनचा उपयोग केला जाणार आहे. शहरातील डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी अत्याधुनिक इन्स्टा रोड पॅचर मशीनची पाहणी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नुकतीच केली. शहरातील डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी अत्याधुनिक इन्स्टा रोड पॅचर मशीनचा वापर करण्यात येणार आहे.

हिस्लॉप कॉलेज समोरील रस्त्यावर ग्रॅम्स इंफ्राटेक प्रा. लिमिटेडद्वारे आयुक्तांपुढे मशीनचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. पावसाळ्यात डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले निदर्शनास येतात. हे खड्डे जलद प्रभावाने बुजविता यावेत यादृष्टीने इन्स्टा रोड पॅचर मशीनचा उपयोग होणार आहे. आयआरपी - जीआयपीएसएटी अस्फाल्ट टेक्नॉलॉजीवर आधारित इन्स्टा रोड पॅचर मशीनद्वारे कमीत कमी वेळेत खड्डे बुजविण्याचे काम होते. कंपनीचे प्रबंध निदेशक गोविंद बजाज यांनी सांगितले की, छोटे तसेच मोठ्यात मोठे सर्व प्रकारचे खड्डे बुजविण्यास मशीनचा उपयोग होतो. विशेषत: पावसाळ्यामध्ये मशीनमुळे खड्डे बुजविण्यास फायदा होतो.

मशीनचे तंत्रज्ञान पर्यावरणपूरक आहे. दोन वेगवेगळ्या मशीनच्या माध्यमातून कमीत कमीत वेळेत दोन खड्डे दुरुस्त करण्याचे प्रात्यक्षिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यापुढे दाखविण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अजय डहाके, विजय गुरुबक्षाणी, उपअभियंता प्रमोद मोकाडे आणि धरमपेठ झोनचे कर्मचारी उपस्थित होते.