Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : विकासकामांसाठी आता नागपूर मनपाला मिळणार सीएसआर निधीची साथ

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : शहरात आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण, झोपडपट्टी विकास आदी क्षेत्रातील विविध विकास कामे करण्यासाठी आता नागपूर महापालिकेला सीएसआर अर्थात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीची साथ मिळणार आहे. यासंदर्भात गुरूवारी  नागपूर महापालिका आणि कौटिल्य कन्सल्टन्सी एलएलपी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

नागपूर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि कौटिल्य कन्सल्टन्सीचे धनंजय महाजन यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. कौटिल्य कन्सल्टन्सी ही मनपाच्या विविध विभागांना आरोग्य, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, झोपडपट्टी पुनर्वसन आणि सुविधा व इतर क्षेत्रात व्यवसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) अंतर्गत निधी प्राप्त करण्यासाठी सहकार्य करणार आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. 

विविध उद्योगांमधून सीएसआर निधी प्राप्त करण्यासाठी, शहर विकासासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पातील नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त प्रकल्पांची निवड करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. मनपाने हाती घेतलेल्या विविध प्रकल्पांना निधी मिळवून देण्याकरिता मनपा आणि कॉर्पोरेट कंपन्या यांच्यातील दुवा म्हणून कौटिल्य कन्सल्टन्सी काम करणार आहे. कंपनी सार्वजनिक-खाजगी भागीदारीसाठी काम करणार आहे. तसेच मनपा हद्दीतील शास्वत सामाजिक, आर्थिक विकास आणि समाज कल्याणासाठी संशोधन, विश्लेषण, नाविन्यपूर्ण डिझाइनिंग, नियोजन आणि देखरेख कार्य प्रदान करणार आहे. कौटिल्य कन्सल्टन्सीचे सदस्य धनंजय महाजन, पंकज पाटील, मनीष कुदळे, संदेश जोशी, ‌ऋग्वेद येनापुरे, दुशांत बोंबोडे, तेजस ठाकूर यांनी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या महात्मा गांधी नॅशनल फेलो (MGNF) कार्यक्रमांतर्गत विविध जिल्ह्यांतील विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली काम केले आहे.