Nala safai Tendernama
विदर्भ

Nagpur : पावसाळापूर्व नद्या, नालेसफाई मिशन मोडवर; 170 पेक्षा जास्त नाल्यांची सफाई

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : पावसाळ्यापूर्वी नागपूर शहरातील नदी आणि नाले सफाईची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा या तिन्ही प्रमुख नद्यांची आतापर्यंत सुमारे 60 टक्के स्वच्छता झाली आहे. तर 170 पेक्षा जास्त नाल्यांची सफाई पूर्ण झालेली आहे.

पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे नदीच्या प्रवाहाला अडथळा होऊ नये व सुरळीतरित्या पाणी वाहून जावे यादृष्टीने निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. नागपूर शहरातून वाहणाऱ्या नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी या तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य प्रगतीपथावर आहे. फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या नदी आणि नाले स्वच्छता अभियानामध्ये आतापर्यंत शहरातील तिन्ही नद्यांच्या सफाई अभियानाने गती पकडली आहे. या सफाई अभियानामध्ये नदीच्या सखोल स्वच्छतेवर भर देऊन जास्तीत जास्त गाळ काढला जात आहे.

नाग नदीची लांबी 16.58 किमी, पिवळी नदीची लांबी 17.42 आणि पोहरा नदीची लांबी 15.17 किमी आहे. यापैकी या तिन्ही नद्यांचे एकूण 60 टक्के काम झालेले आहे. तिन्ही नद्यांच्या सफाईमधून 15 पोकलेनद्वारे 93918.04 क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे. 15 जून 2024 पूर्वी शहरातील तिन्ही नद्यांची स्वच्छता पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. नदी स्वच्छतेच्या कार्यात आवश्यक मशीन आणि मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले असून निर्धारित वेळेत कार्य पूर्ण व्हावे याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येत आहे. नागपूर शहरात एकूण 227 नाले असून यापैकी 153 नाल्यांची सफाई मनुष्यबळाद्वारे तर 74 नाल्यांची सफाई मशीनद्वारे केली जाते. आतापर्यंत 170 पेक्षा जास्त नाल्यांची सफाई पूर्ण झालेली असून उर्वरित नाल्यांची सफाई लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.