नागपूर (Nagpur) : गणरायाच्या विसर्जनाला नागपूर महापालिकेच्यावतीने शहरभर कृत्रिम तलावांच निर्मिती केली जात आहे. नद्या आणि तलाव प्रदूषित होऊ नये याची काळजी घेतली जात असल्याने महापालिकेला फक्त कृत्रिम तलावांसाठी ७० लाख रुपये खर्च करावे लागणार आहे.
गणपतीच्या विसर्जनासाठी महापालिकेतर्फे शहरात एकूण ३५० कृत्रिम तलाव तयार केले जाणार आहे. सर्व तलाव रबराचे आहेत. त्यात हवा भरून पाणी सोडले जातो. घरगुती गणपतीचे विसर्जन यात केले जाते. येथून सर्व निर्माल्य विशिष्ट ठिकाणी पोचवले जातो. त्याचे खत तयार केले जाते. निर्माल्य, विसर्जन झाल्यानंतर मातीची विल्हेवाट, प्रत्येक कृत्रिम तलावांमध्ये टँँकरद्वारे पाणी पुरवठा,बॅरिकेड्स, बंदोबस्त आदीचा खर्च धरल्यास विसर्जनावर महापालिके सुमारे एक कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
विसर्जनामुळे तलाव प्रदूषित होत असल्याने पर्यावरणवाद्यांनी मोठी चळवळ सुरू केली आहे. त्यातूनच पीओपीच्या मूर्तीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र मातीच्या मूर्तींमुळेसुद्धा पाण्याचे स्रोत प्रदूषित होत असल्याने कृत्रिम तलावांची संकल्पना पुढे करण्यात आली. सुमारे पाच वर्षांपासून मोठ्या तलावांमध्ये मूर्ती विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्याचे आवाहन केले जात आहे. त्याकरिता महापालिकेमार्फत कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. सुरुवातीला या तलावांची संख्या शंभर होती. ती यावर्षी साडेतीनशे झाली आहे. एक तलाव खरेदी करण्यासाठी सुमारे २० हजार रुपयांचा खर्च येतो. जड मूर्ती या तलावांमध्ये टाकल्याने फुटण्याचा धोका असतो. याशिवाय अतिश कळजीपूर्वक या तलावांना हाताळावे लागतो. एखादी टाचणी जरी लागली तरी हवा निघून जाते. त्याशिवाय विसर्जन आटोपल्यावर वर्षभर ते जपून ठेवावे लागतात. मात्र एकदा काम झाल्यावर त्याची कोणी काळजी घेत नाही. गोदामांमध्ये ते पडून असतात. त्यामुळे आता दरवर्षीच मोठ्या प्रमाणात रबरांच्या तलावाची खरेदी करावी लागत आहे. उच्च न्यायालयानेसुद्धा महापालिके पुरेशा प्रमाणत कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहे.