नागपूर (Nagpur) : नागपूर शहराच्या शाश्वत विकासासह नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी नागपूर महापालिका कार्यतत्पर आहे. शहरातील सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे कार्य प्रगतीपथावर असून, नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात मनपा क्षेत्रातील विकास कार्य आणखी जोमाने केल्या जात आहे.
नागपूर महापालिका हद्दीत विविध यंत्रणेसह मनपाचे एकूण 3946.574 कि.मी. लांबीचे रस्ते असून, त्यापैकी 12 मी. किंवा त्यापेक्षा जास्त रुंदीचे जवळपास 300 कि.मी. लांबीचे रस्ते आहेत. नागपूर शहरात मनपाच्या अखत्यारीत एकूण 2406 कि.मी लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी 1716 कि.मी. ( 72 टक्के लांबी ) चे रस्ते डांबरी आहेत तर व 690 कि.मी. (28 टक्के लांबी) चे रस्ते कॅाक्रीट आहेत. नागपूर शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी तसेच दरवर्षी डांबरीकरणाच्या कामांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी डांबरी रस्त्याचा पृष्ठभाग हा सिमेंट काँक्रीटचा करण्यात येत आहे.
बनविले जातील 300 कोटींचे रस्ते :
मनपाने स्वनिधितून सिमेंट रस्ते प्रकल्प टप्पा- 1 हाती घेण्यात आला असून, या प्रकल्पातंर्गत 17 कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. अशात शहर सिमेंट कॉंक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा- 4 करिता शासनाने 1 डिसेंबर 2023 रोजी रस्त्याच्या यादीला मान्यता प्रदान केली. तर शासनाद्वारे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या परिक्षेत्रात अधिसुचीत विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविणे अंतर्गत रु. 300 कोटी मनपाला प्राप्त आहेत. त्यानुसार रु. 300 कोटी रक्कमेच्या एकूण 23.45 कि.मी. लांबीच्या रस्त्याचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी नागपूर यांच्या कडे सादर करण्यात आला असून, मंजुरी प्राप्त झाल्यावर कामाच्या टेंडर मागून सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे कामे करण्यात येणार आहे. याशिवाय शासन, नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगरपालिका यांचे सम आर्थिक सहभागातून सिमेंट रस्ते प्रकल्प टप्पा- 2 अंतर्गत एकूण रु. 300 कोटी रक्कमेचे प्रकल्प हाती घेण्यात आले असून, या प्रकल्पांतर्गत एकूण 52 कि.मी. लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात आले आहेत. तर सिमेंट रस्ते प्रकल्प टप्पा- 3 अंतर्गत रु. 300 कोटी रक्कमेचे प्रकल्प हाती घेण्यात आले असून, या प्रकल्पांतर्गत 30 कि. मी. लांबीच्या रस्त्याचे सिमेंट कॉक्रिटीकरण करण्यात आले आहेत.