नागपूर (Nagpur) : पावसाळ्यापूर्वी शहरातील प्रमुख तीनही नद्यांच्या स्वच्छतेचे लक्ष्य पूर्ण झाले असल्याची माहिती नागपूर महापालिकेने दिली आहे. शहरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदीच्या स्वच्छतेचे कार्य पूर्ण करण्यात आलेले आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात नदी स्वच्छता अभियान पूर्ण करण्यात आले आहे.
नागपूर शहरातून वाहणा-या नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी या तिनही नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शनात फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आले होते. नदी स्वच्छता अभियानाद्वारे तीनही नद्यांच्या पात्रातून एकूण 1 लाख 31 हजार 429.17 क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. नाग नदीची लांबी 16.58 किमी, पिवळी नदीची लांबी 17.42 आणि पोहरा नदीची लांबी 15.17 किमी आहे. नाग नदीची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. स्वच्छते दरम्यान 64896.05 क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला. या नदीतून 31630 क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला. पोहरा नदीच्या स्वच्छतेचे देखील कार्य पूर्ण झाले. या स्वच्छतेतून 34903.12 क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला, अशी माहिती अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी दिली.
पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे नदीच्या प्रवाहाला अडथळा होऊ नये व सुरळीतरित्या पाणी वाहून जावे यादृष्टीने यावर्षी वर्षाच्या सुरुवातीलाच नदी स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले होते. अभियानाच्या अनुषंगाने आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्याद्वारे वेळोवेळी आढावा देखील घेण्यात आला. स्वत: आयुक्तांनी अनेक ठिकाणी भेट देउन नदी स्वच्छतेच्या कार्याची पाहणी केली. येणा-या अडचणी जाणून घेतल्या व त्या सोडविण्याच्या दृष्टीने कार्यवाही देखील केली. आवश्यक त्या ठिकाणी सूचना करून त्यादृष्टीने काम करून घेतले. विभागातील समन्वय आणि आयुक्तांकडून वेळोवेळी घेण्यात येत असलेल्या आढाव्यामुळे पावसाळ्यापुर्वीच तीनही नद्यांची स्वच्छता पूर्ण झालेली आहे. नागपुरातील नदी प्रदूषण निवारण प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या नियुक्तीसाठी दोन कंपन्यांनी पुढाकार घेऊन काम केले. सुमारे 2000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचा उद्देश नाल्यात बदललेल्या नाग नदीचे स्वच्छ आणि पुनरुज्जीवन करणे हा होता. आणि 1 लाख 31 हजार क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे.