नागपूर (Nagpur) : महापालिकेचे केंद्रीय कार्यालय, झोन कार्यालयासह शहरातील काही बसथांब्यांवर नागरिकांच्या ऑनलाइन व्यवहारासाठी लावण्यात आलेले किऑस्कची स्थिती भंगारापेक्षा वेगळी नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या किऑस्कमधील दोन कोटी रुपयांचे सॉफ्टवेअर कालबाह्य झाले असून, ६५ किऑस्कवर ६५ लाखांचा खर्च झाला आहे.
दूरदृष्टीअभावी पैशाचा चुराडा करण्याचे हे एक उत्तम उदाहरण असल्याचे दिसून येत आहे.
साडेतीन वर्षांपूर्वी शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत ४० बसथांब्यांवर प्रत्येकी एक तर प्रत्येक झोन कार्यालयात दोन व महापालिकेच्या कार्यालयात दोन, तहसिल कार्यालय आदी ठिकाणी ६५ किऑस्क लावण्यात आले आहेत. एका किऑस्कची किंमत ९९ हजार रुपये होती. या किऑस्कसाठी मदुराई येथील एका कंपनीने दोन कोटी रुपयांचे सॉफ्टवेअर तयार करून दिले होते.
मोबाईल व इंटरनेट क्रांतीमुळे आज ६५ लाखांचे किऑस्क व त्यासाठी दोन कोटी रुपयांचे तयार केलेले सॉफ्टवेअर आता काहीच कामाचे नसल्याचे दिसून येत आहे. मुळात किऑस्क लावल्यापासूनच ते नागरिकांच्या कुठल्याही कामात नाहीच. अनेक बसथांब्यावर किऑस्कच्या आजूबाजूला मोकाट कुत्रे दिसून येतात. साडेतीन वर्षांपूर्वीही प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याची जाणीव असूनही हा प्रकल्प राबवून त्यावर अडीच कोटींचा खर्च करण्यात आला. पुढील साडेतीन वर्षात मोबाईल व इंटरनेट क्रांतीचे संकेत मिळत असतानाही हा प्रकल्प राबवून नागरिकांनी टॅक्सच्या स्वरुपात दिलेल्या पैशाची उधळण करण्यात आल्याचे अधोरेखित होत आहे.
किऑस्कच्या सुविधा
- जन्म, मृत्यू, नो ड्यू प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन अर्ज
- कचरा, दूषित पाण्यासंदर्भात तक्रार
किऑस्क बिनकामाचे का?
- कचरा, दूषित पाणी, सिवेजसाठी
मनपाचे स्वतंत्र ॲप
- ऑनलाइन अर्ज, तक्रारींची सुविधा मोबाईलवर
कंपन्यांना लाभ पोहोचविण्यासाठी प्रकल्प?
या किऑस्कसाठी तीन वर्षापूर्वी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले. या सॉफ्टवेअरचा ढाचा एकदमच साधा असून त्यात ब्राऊजर असून फक्त लिंक दिल्या असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञाने नमुद केले. ही साधी पद्धत तीन वर्षापूर्वी मोबाईलवरही उपलब्ध होती. असे असतानाही या प्रकल्पावर केलेला खर्च केवळ कंपन्यांना लाभ पोहोचविण्यासाठी तर नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सॉफ्टवेअर तयार करताना या बाबी का टाळल्या?
या किऑस्कचे सॉफ्टवेअर तयार करताना नागरिकांना कायम कामात येऊ शकतील, असा सुविधा देता येणे शक्य होते. बसथांब्यावर किऑस्क लावले असल्याने नागरिकांना येथे ऑनलाइन पैसे भरून बस तिकिटाची प्रिंट निघू शकेल, अशी यंत्रणा लावता आली असती. यातून शहरबसमधील कंडक्टरचा खर्च वाचला असता, परंतु याबाबीकडे दररोज देखभालीचा खर्च टाळण्याकरिता दुर्लक्ष करण्यात आल्याचेही सूत्राने नमुद केले.