नागपूर (Nagpur) : प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. ती संपली की त्याचा प्रचंड त्रास होतो. नागपूरमधील गड्डगोदाम परिसरात सुमारे वर्षभरापासून भूमिगत सांडपाण्याची वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. कंत्राटदाराला काम संपवण्याची मुदत महापालिकेने दिली नसल्याने वाटेल तेव्हा काम सुरू आणि बंद केले जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक चांगलेच वैतागले असून भिक नको पण कुत्रा आवार असे म्हणण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे.
शहरात जी-२० साठी येणाऱ्या देशी-विदेशी पाहुण्यांसाठी युद्धस्तरावर शहर चकाचक केले जात आहे. दुसरीकडे गड्डीगोदाम येथील नागरिक वर्षानुवर्षांपासून सुरू असलेल्या कामांमुळे त्रस्त झाले आहेत. गड्डीगोदाम नवीन भूमिगत सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम येत्या दशकात संपेल असे वाटत नाही. महापालिकेने काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला कोणतीही मुदत दिलेली नाही. याचा पुरेपूर फायदा कंत्राटदार घेत असून वाटेल तेव्हा काम सुरू आणि बंद केले जात आहे. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे आणि विशेषत: येण्या जाणाऱ्या लोकांना आणि शाळकरी मुलांना धोका निर्माण झाला आहे.
तेथील स्थानिक लोकांनी सांगितले की, अनियमित कचरा उचलणे, सफाई कामगारांची अनुपस्थिती, ओसंडून वाहणाऱ्या आणि गुदमरलेल्या गटारांच्या लाईन आणि विकासकामांच्या अंमलबजावणीची संथ गती यासारख्या अनेक समस्या त्यांच्या परिसरात आहेत. मात्र याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रार केली तरी त्याची दखल घेतल्या जात नाही. सेंट जॉन्स हायस्कूल असलेल्या लेनमध्ये सर्वात जास्त समस्या दिसून येते. गड्डीगोदाम चौकातून निघालेल्या लेनची रुंदी खूपच अरुंद आहे आणि परिसरात शाळा असल्यामुळे ती दिवसभर गजबजलेली असते.
सेंट जॉन हायस्कूलच्या मुख्य गेटसमोर महापालिकेच्या ठेकेदाराने रस्ता खोदला होता. जवळपास वर्षभरापासून हे काम सुरू असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. शाळेच्या आवारात प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी शाळेतील विद्यार्थी दररोज या रस्त्याचा वापर करतात. ऑटो रिक्षा, स्कूल व्हॅन, दुचाकीवरील पालक आणि शाळेत जाणारे विद्यार्थी, सकाळ आणि दुपारच्या वेळी या ठिकाणी गर्दी करतात. गर्दीच्या वेळी, रस्त्यावर अनागोंदी असते आणि जास्त गर्दी असते. जर महापालिकेने वेळीच कार्यवाही न केल्यास ते धोकादायक ठरू शकते.
माजी आमदार प्रकाश गजभिये यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले, "आम्ही अनेक वेळा संबंधित एनएमसी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. परंतु काहीही बदलले नाही आणि येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन कराव लागत आहे. सोबतच सेंट जॉन हायस्कूलच्या व्यवस्थापनाने सांगितले की, रस्ता खराब असल्यामुळे फार त्रास होत आहे. महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी चालू कामाला गती देण्याचे आश्वासन दिले होते. शाळेचे व्यवस्थापक यांनी अनेकदा अधिकाऱ्यांशी भेट घेतली. अधिकाऱ्यांना भेटण्यात त्यांचा वेळ वाया जातो त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याने आता त्यांनी तक्रार करणे बंद केले आहे. या संदर्भात मंगळवारी झोनचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत सोनकुसरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.