Nagpur Municipal Corporation Tendernama
विदर्भ

Nagpur : महापालिकेला मिळणार का 87 कोटींचा निधी? अजून पहिलेच प्रस्ताव...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : निधी मिळण्यासंबंधीचे आधीचे प्रस्ताव प्रलंबित असताना नागपूर महापालिकेने गेल्या आठवड्यात अतिवृष्टिमुळे झालेल्या नुकसानासाठी 87.59 कोटींचा निधी मिळण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. 20 जुलैला झालेल्या पावसाचा फटका शहरातील 456 वस्त्यांना बसला होता. 

यात 30 किलोमीटरचे रस्ते, 6.15 किलोमीटर लांबीच्या नाल्यांच्या संरक्षक भिंतीचे नुकसान झाले होते. गेल्यावर्षी 23 सप्टेंबरला पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी 204 कोटींचा निधी मिळावा असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. मात्र, महापालिकेला केवळ 14.5 कोटींची मदत मिळाली. मंजूर झालेला निधी अजूनही पूर्णपणे मिळालेला नाही. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शहरातील दहा झोनपैकी धरमपेठ व गांधीबाग झोनला पावसाचा फटका बसला नाही. दरम्यान, लक्ष्मीनगर झोनमध्ये तब्बल 1.32 किलोमीटरचे रस्ते आणि 720 मीटरच्या संरक्षक भिंतीचे नुकसान झाले. यासाठी अनुक्रमे 83 लाख आणि 8 कोटींची मागणी करण्यात आली. पावसामुळे हनुमाननगर झोनमधील सुमारे 2.64 किलोमीटरच्या रस्त्यांचे नुकसान झाले असून याचा खर्च सुमारे 2.63 कोटी इतका आहे. 

दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण नागपूरच्या भागांचा समावेश असलेल्या धंतोली झोनला पुराचा सर्वाधिक फटका बसला. या झोनमध्ये 2.04 कोटींच्या 1.68 किलोमीटरच्या रस्त्यांचे नुकसान झाले. ज्या परिसरात नुकसान झाले त्या परिसरातिल नुकसानग्रस्त घराचे, रस्त्याचे पंचनामे करण्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ अभिजीत चौधरी यांनी दिले आहे. अश्या लोकांना सुद्धा महानगरपालिके तर्फे आर्थिक मदत केली जाणार आहे.