Gharkul Yojana Tendernama
विदर्भ

Nagpur : 'स्वप्ननिकेतन'साठी तुम्हीही करू शकता अर्ज; ही शेवटची मुदत

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर महापालिकेच्या झोपटपट्टी पुनर्वसन प्राधिकरणद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मौजा वांजरा, कामठी रोड येथे उभारण्यात येत असलेल्या ‘स्वप्ननिकेतन’ या प्रकल्पातील फ्लैट्स विक्रीकरिता नोंदणी करण्यासाठी नागरीकांच्या मागणीवरुन 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

येत्या 11 जुलै पर्यंत 480 फ्लैट्स करिता अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत. मौजा वांजरा, कामठी रोड येथील ‘स्वप्ननिकेतन’ प्रकल्पामधील 480 फ्लैट्सकरिता मनपाच्या www.nmcnagpur.gov.in याअधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी आदेश निर्गमित केले आहे. ‘स्वप्ननिकेतन’ प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक गरजूंचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. यापूर्वी 25 जून पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. आता यात 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांना 11 जुलै पर्यंत हक्काच्या घरासाठी अर्ज सादर करता येणार आहे. नागरीकांनी या योजनेला उत्त़म प्रतिसाद दिला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कामठी रोडवरील पिवळी नदी जवळ मौजा वांजरा येथे उभारण्यात येत असलेल्या ‘स्वप्न निकेतन’ या प्रकल्पाचे कार्य प्रगतीपथावर सुरू असून, या प्रकल्पांतर्गत 480 फ्लैट्सची निर्मिती केली जात आहेत. यामध्ये 28.21 चौ.मी./303.65 चौ. फुट चटई क्षेत्रफळ असलेले 1BHK फ्लैट्स आहेत. फ्लैट्स ची एकूण किंमत 11,51,845 एवढी असून, प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत शासनातर्फे 2,50,000 रुपये अनुदान असून फ्लैट्सचे विक्री मूल्य 9,01,845 रूपये आहे. फ्लैट्स खरेदी करण्याकरिता अर्ज नोंदणीसाठी आणखी 15 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. अर्जाचे शुल्क 2000 रुपये (ना परतावा) ऑनलाईन जमा करावे लागेल. सदनिकांचे वाटप लॉटरी पद्धतीने करण्यात येईल. वाटपाचे अटी व शर्ती आणि अर्ज भरण्याकरिता आवश्यक माहिती www.nmcnagpur.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. अर्ज करते वेळी कुटुंबातील व्यक्तींचे आधार कार्ड, कुटुंबातील व्यक्तींचे रेशनकार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड यापैकी कोणतेही, बँक पासबुक, दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, चालु मोबाईल क्रमांक व इतर दस्तावेज बाळगणे आवश्यक आहे. 

प्रकल्पातील 480 फ्लॅट्समध्ये 50 टक्के अर्थात 240 फ्लॅट्स अराखीव असून 13 टक्के अनुसूचित जाती, 7 टक्के अनुसूचित जमाती, 30 टक्के इतर मागास प्रवर्ग आणि 5 टक्के –समांतर आरक्षण दिव्यांग प्रवर्गाकरिता राखीव आहेत. प्रकल्पामध्ये बाग, कम्यूनिटी हॉल, लॉबी, लिफ्ट आणि पाणी पुरवठा करणा-या पंपला लागणा-रा वीज निर्मितीसाठी सोलर पॅनलची सुविधा, सौर उर्जेमार्फत गरम पाण्याची सुविधा, पर्जन्य जलसिंचन प्रकल्पाची सुविधा, जलनि:स्सारण प्रकल्पाची सुविधा आहे.