road Tendernama
विदर्भ

चौक सोडून रस्त्यांचे काँक्रिटीकरण; कंत्राटदारांसाठी आता चौकांचे...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी खड्डेमुक्त नागपूर शहराचा संकल्प करताना सर्वत्र काँक्रिट रस्ते तयार करीत आहेत. मात्र महापालिकेमार्फत कंत्राट देताना यात चूक झाली आहे. त्यात चौकांचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे कंत्राटदारांनी रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले मात्र चौक तसेच सोडून दिल्याने नागपूरकरांना आता वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे चौकांच्या काँक्रिटीकरणासाठी वेगळे टेंडर काढावे लागणार आहे. त्यामुळे कंत्राटदारांचे चांगलेच फावणार आहे.

शहरात सिमेंट रस्ते तयार झाले किंवा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. परंतु सिमेंट रस्ते पूर्ण झाल्यानंतर ॲप्रोच रस्त्यापर्यंत ना धड उतार काढला ना धड आयब्लॉक लावले. त्यामुळे ॲप्रोच रस्त्यावरून सिमेंट रस्त्यावर वाहनासह चढणे किंवा सिमेंट रस्त्यावरून ॲप्रोच रस्त्यावर उतरताना नागरिकांची हाडे खिळखिळी होत आहे. एवढेच अनेकदा आयब्लॉक सदोष पद्धतीने लावल्याने दुचाकीही घसरण्याचे प्रकार वाढले आहे. परिणामी नागरिकांना रस्ते तर मिळाले, परंतु सोबतच नवी समस्याही तयार झाली आहे.

शहरात मुख्य रस्ते तसेच वस्त्यामध्येही सिमेंटीकरण करण्यात येत आहे. एकूणच शहरात सिमेंट रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्यांची कामे अर्धवट आहे. काही ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना रहदारी करताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. परंतु रस्ते झाल्यानंतर हा मनस्ताप कमी होईल, या अपेक्षेने नागरिक गप्प आहेत. परंतु रस्ते झाल्यानंतरही त्यांचा मनस्ताप कायम असल्याचे दिसून येत आहे. सिमेंट रस्ते उंच झाले तर वस्तीतून सिमेंट रस्त्यांना जोडले जाणारे ॲप्रोच मार्ग खाली झाली आहेत. त्यामुळे वस्तीतून सिमेंट रोडवर येताना नागरिकांना धक्के सहन करावे लागत आहे. मणक्याचे दुखणे, स्पॉंडिलायटिसग्रस्तांना या रस्त्यावरून वाहने घेऊन जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शारदा चौक ते अयोध्यानगर तसेच शारदा चौक ते रिज रोडपर्यंत सिमेंट रस्ता तयार करण्यात आला आहे. सिद्धेश्वर हॉलजवळून वंजारीनगर जलकुंभाकडे जाणारा सिमेंट रस्त्याही तयार करण्यात आला. शारदा चौकातून अयोध्यानगरच्या रस्त्याला सिमेंट रस्ता जोडण्यात आला. या सिमेंट रस्त्याला योग्य उतार देण्यात आला नाही. अजूनही हा उतार ओबडखाबड आहे.

परिणामी सिमेंट रस्त्यावरून खाली उतरताना चारचाकी, दुचाकी वाहनातील नागरिकांना धक्के सहन करावे लागत आहे. याशिवाय शारदा चौकातून रघुजीनगर रस्‍त्याकडे जाणाऱ्या रस्त्याचीही हीच दशा आहे. सिद्धेश्वर हॉलकडे जाणाऱ्या रस्त्याचा उतारही जणू पायरीसारखा करण्यात आला. त्यामुळे वाहनधारकांच्या मणक्याला धक्के बसत आहेत. दत्तात्रयनगर उद्द्यानापुढील रस्ता तसेच सिद्धेश्वर हॉलजवळून वंजारीनगर जलकुंभाकडे जाणाऱ्या रस्त्याचीही हिच स्थिती आहे. या प्रमुख रस्त्यांना वस्त्यातील रस्ते जोडण्यात आले. वस्तीतून बाहेर या रस्‍त्यांवर येताना योग्य उतार नाही. परिणामी वस्तीतील प्रत्येकच नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अपघाताची टांगती तलवार
सिमेंट रस्ता व आयब्लॉक खाली-वर असल्याने अनेकदा दुचाकीधारक घसरून पडत आहे. विशेषतः मागून वेगाने येणाऱ्या वाहनाला पुढे जाण्यास जागा देताना दुचाकीधारक आयब्लॉकवर उतरतात. आयब्लॉकवरून त्याच वेगाने सिमेंट रस्त्यावर येताना सिमेंट रस्त्याची धारदार किनार वाहनाच्या चाकाला ग्रीप करण्यात अपयशी ठरत असल्याने दुचाकीधारक घसरून पडत आहे. आतापर्यंत अनेक अपघात झाले. ॲप्रोच रस्ते, आयब्लॉक सदोष असल्याने नागरिकांवर कायम अपघाताची टांगती तलवार आहे.