नागपूर (Nagpur) : शहरातील अनेक फूटपाथ सदोष आहे. एवढेच नव्हे अनेक फूटपाथवर डीपी, झाडे असल्याने चालणाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागते. त्यामुळे अनेकदा खाली रस्त्यावर उतरणे, फूटपाथवर चढणे, या प्रक्रियेमुळे चालणाऱ्यांना गुडघेदुखीचा त्रास होत आहे. परंतु आता या सदोष फूटपाथच्या त्रासातून मुक्ती मिळण्याचे आयुक्तांच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट होत आहे. शहरात वॉकेबल कॉरिडोअर व वॉकर्स स्ट्रिट आयुक्तांनी प्रस्तावित केले असून त्यासाठी तरतूदही केल्याने भविष्यात नागपूरकरांचे पायी चालणे सुलभ होणार आहे.
शहरातील फूटपाथची दुर्दशा झाली आहे. पादचाऱ्यांच्या चालण्यास एकही फूटपाथ अनुकूल नाही. अनेकदा नागरिकांना मुख्य रस्त्याच्या फूटपाथवरून चालतानाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या भिंतीच्या बाजूला फूटपाथवर मोठे भगदाड पडले असून त्यात एखादा व्यक्ती पडण्याची शक्यता आहे. अशीच स्थिती सिव्हिल लाईन्स येथील काही फूटपाथची आहे. आयुक्तांनी या फूटपाथमध्ये सुधारणांसह ते पर्यावरणपूरक करण्याचे संकेत अर्थसंकल्पातून दिले आहे. त्यांनी ‘वाकेबल कॉरिडोअर’ची संकल्पना राबविण्याचा संकल्प केला आहे. रस्त्यांवरील वाहतूक कमी करण्यासाठी रस्त्यालगत चालण्यायोग्य आधुनिक पादचारी मार्ग तयार करण्याचे प्रस्तावित केले आहे. या कामासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
‘वॉकेबल कॉरीडोअर’साठी वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. वॉकेबल कॉरिडोअरमुळे नागरिकांच्या पायी चालण्याच्या प्रवृत्तीत वाढ होईल, असा दावा आयुक्तांनी केला आहे. याशिवाय पोलिस जिमखाना ते मुख्यमंत्री निवास्थान रामगिरीपर्यंत असलेल्या वॉकर्स रोडप्रमाणेत इतर रस्त्यांवरही वॉकर्स स्ट्रिट तयार करण्याचे त्यांनी प्रस्तावित केले आहे. वाहनांचा वापर कमी होऊन शहर पर्यावरणपूरक व्हावे, या हेतूने त्यांनी या उपाययोजना सुचविल्या आहे. विशेष म्हणजे सध्या सत्ताधाऱ्यांचा अडथळा नसल्याने यावर तत्काळ अंमलबजावणी होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.