Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : महापालिकेचा 5523 कोटींचा अर्थसंकल्प; बघा काय म्हणाले मनपा आयुक्त

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर महापालिकेचे प्रशासक आणि आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी 2024-25 या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प गुरूवारी सादर केला. मनपा आयुक्तांनी 2024-25 या वर्षाचा 5565 कोटी उत्पन्नाचा आणि 5523.73 कोटी खर्चाचा व 41.34 कोटी शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर केला. 

मनपाच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प मांडताना मनपा प्रशासक व आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी अर्थसंकल्पात 2023-24 या वर्षातील एकूण खर्च 3654.48 कोटी नमूद केले. 2024-25 या वर्षातील हाती घ्यावयाच्या विकास कामाचे नियोजन करताना त्या कामाची तात्काळ उपयोगीता व गरज आहे त्याकडे विशेष लक्ष देण्यात आले असून विशेष महत्वाचे व तात्काळ हाती घ्यावयाच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. अर्थसंकल्प सादर करताना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मनपाचा अर्थसंकल्प हा वास्तविकतेवर आधारित असून यातील निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अविरत प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

या विषयांवर दिला जाणार भर : 

अर्थसंकल्पामध्ये शहर स्वच्छता, शिक्षण विभागाचे बळकटीकरण, क्रीडा क्षेत्राचा विकास, आरोग्य यंत्रणेला उभारी, शहर सुरक्षेसाठी अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागाचे अपडेशन, मोकाट श्वानांच्या नसबंदीला प्राधान्य, नवीन सुलभ शौचालयांची निर्मिती, जलवाहिन्यांच्या जाळ्यांचा विस्तार अशा विविध बाबींकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या शाळांचा विकास आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने ‘मिशन नवचेतना’ या नव्या अभियानाची सुरूवात करण्यात येत आहे. 100 पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये इलेक्ट्रिफिकेशन, बाला कन्सेप्ट वर्गखोल्या, डिजिटल वर्गखोल्या आदी सुविधा प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय मनपाचा महत्वकांक्षी प्रकल्प सुपर 75 मध्ये आता विज्ञान शाखेसोबतच कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा देखील सी.ए. सारख्या अभ्यासक्रमासाठी समावेश करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे संचालित इंग्रजी शाळांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता या शाळांच्या नव्या इमारतींची निर्मिती केली जाणार आहे. मनपाच्या 5 शाळांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळांची निर्मिती केली जाणार आहे.

असा केला जाणार विकास : 

नागपूर शहरातील मैदानांचा विकास, क्रीडा संकुलांचा विकास आणि खेळाडूंसाठी खेळण्याच्या सुविधा प्रदान करण्याकरिता अर्थसंकल्पामध्ये 26.80 कोटी एवढी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. शहरात महिला आणि पुरूषांसाठी नवीन बेघर निवारा केंद्रांची निर्मिती देखील केली जाणार आहे. शहर सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक 10 किमीवर 1 अग्निशमन केंद्र प्रस्तावित करण्यात आलेले असून शहरात 22 केंद्रांचा मास्टर प्लॉन तयार करण्यात आलेला आहे. शहरातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 10 कोटी रुपयांची विशेष तरतूद देखील अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे.

अर्थसंकल्पातील ठळक बाबी व आर्थिक तरतूद : 

मालमत्ता करामध्ये वाढ नाही, 8406 नवीन मालमत्ता कर निर्धारित कक्षेत आणून मालमत्ता कर रक्कमेत वाढ.

मालमत्ता करा पासून रु. 330 कोटीचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आलेले आहे.

रस्ते सुधारणा व निर्माण करण्याकरिता 100.81 कोटींची तरतूद

अमृत 1.0 अंतर्गत देशातील पहिले डबलडेकर जलकुंभाची निर्मिती होणार  

अमृत 2.0 अंतर्गत मनपाच्या अधिकृत व अनधिकृत लेआउट तसेच स्लम क्षेत्रात व्यवस्था, फिडर मेन टाकणे, बुस्टर पंम्प बसविण्याचे कार्य करण्यात येणार आहे.