नागपूर (Nagpur) : महापालिका निवडणूक लांबल्याने पाच मार्चपासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सुमारे सहा महिन्यांच्या कालावधीत कामेच होत नसल्याने शहरातील विविध भागात समस्यांचा डोंगर उभा झाला. किरकोळ तक्रारीसाठी नागरिकांंना दोन दोन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे.
अनेक वस्त्यांमध्ये खोदकाम केले, मात्र त्याचे पुनर्भरण केले नसल्याने अधिकाऱ्यांचे कंत्राटदारांच्या कामावरही लक्ष नसल्याचे दिसून येते. विकास कामांमध्ये सत्ताधाऱ्यांचा अडथळा नसल्याने शहरातील विकास कामांना गती तसेच नागरी समस्याही तत्काळ सुटतील, अशी अपेक्षा शहरवासींना होती. या सहा महिन्यांत पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे प्रमुख होते. परंतु जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने पावसाळी तयारीचे पितळ उघडे पडले. ड्रेनेज लाईन, सिवेज लाईनच्या क्षमता उघड्या पडल्या. अनेक दिवस वस्त्यांमध्ये पाणी साचल्याचे दिसून आले. नागरिकांनी केलेल्या तक्रारीचीही दखल घेण्यात आली नाही. काही भागात पावसातच पावसाळी नाल्या उघड्या करून स्वच्छ करण्यात आल्या.
शहरातील उद्यानांची दुर्दशा झाली असून गवत गुडघाभर वाढले. सिव्हील लाईन, उत्तर नागपुरातील वस्त्या, दक्षिण नागपुरातील हुडकेश्वर रोड, मानेवाडा बेसा रस्त्यांची चाळणी झाली. हुडकेश्वर पोलिस स्टेशन ते पिपळा रोड ऐन पावसाळ्यात खोदून ठेवण्यात आला. अजूनही या रस्त्यांचे काम सुरू झाले नसल्याने वाहनधारक, पादचाऱ्यांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर अधिकाऱ्यांचे व झोन अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याची प्रचीती या रस्त्यामुळे येत आहे. त्यामुळे शहरात महापालिका आहे की नाही, अधिकारी नेमके कुठल्या कामात आहेत, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.