नागपूर (Nagpur) : नागपूर महामेट्रो रेल्वेने (Nagpur MahaMetro Railway) सुमारे ३८ कोटी रुपये थकवल्याने शहरातील छोटे छोटे कंत्राटदार (Contractor) आणि पुरवठादार बुधवारपासून मेट्रो रेल्वेच्या मुख्यालयासमोर बुधवारपासून उपोषणाला बसले आहेत. दोन वर्षे आम्ही शांत राहिलो. पैसे मिळेल याची वाट बघितली. मात्र मेट्रोने थकबाकी द्यायचीच नाही असे ठरवले असल्याने नाईलाजाने आंदोलन सुरू केले असल्याचे कंत्राटदारांनी सांगितले.
मेट्रो रेल्वेने सीताबर्डी ते खापरी-मिहान या दरम्यान मार्गिका टाकण्याचे कंत्राट ‘आयएल अँड एफएस' या कंपनीला दिले होते. याकरिता २१ जुलै २०१६ रोजी मेट्रो आणि कंपनीत ५३३ कोटी रुपयांचा करार झाला होता. या कंपनीने केलेल्या पहिल्या टप्प्याच्या कामाचे ७ मार्च २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केले होते. आयएलएफस कंपनीने या कामांसाठी स्थानिक वेंडरकडून सेवा घेतली होती. कोणी गाड्यांचा पुरवठा केला तर कोणी पाणी पुरवठा केला. काहींनी क्रेन, ट्रक भाड्याने कंपनीला दिले होते.
पंतप्रधानांनी उद्घाटन केल्यानंतर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आणि आएलएफएस या कंपनीसोबत बिनसले. त्यामुळे काम पूर्ण व्हायच्या आतच कंपनीसोबतचा करार रद्द करण्यात आला. महामेट्रोने उर्वरित कामे कुठलेही टेंडर न काढता त्यानंतर परस्पर केलीत. आयएलएफएस कंपनीला स्थानिक कंत्राटदारांचे ३८ कोटी ८७ देणे बाकी होते. महामेट्रोकडे ११० कोटी रुपयांची बँक हमी जमा आहे. यातून स्थानिक कंत्राटदारांचे पैसे परत करावे असे कंपनीने मेट्रोला लेखी पत्र दिले. सोबत देणी असलेल्या कंत्राटदारांची यादीही सादर केली आहे. सुरुवातीला महामेट्रोने ते मान्य केले होते. त्यानंतरही महामेट्रोने पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा कंत्राटदारांचा आरोप आहे.
महामेट्रोने अनेक कामे विना टेंडर केली आहेत. यात सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा अपहार झाला असल्याचा आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला. मेट्रो रेल्वेने स्थानिक कंत्राटदार, पुरवठादारांचेही पैसे थकवले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मेट्रो परस्पर कामे केल्याचे सिद्ध होते. महामेट्रोच्या घोटाळ्याची आम्ही सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सोपविले आहेत. त्याची दखल सीबीआयने घेतली असल्याचे जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी सांगितले.
धनंजय ट्रॅव्हल्सने आयएलएफएस कंपनीच्यावतीने महामेट्रोच्या कामासाठी चारचाकी वाहनांचा पुरवठा केला होता. त्यांना कंपनीकडून ८८ लाख रुपये घेणे आहेत. दोन वर्षे झाली तरी रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे फायनांस कंपनीने त्यांच्या अनेक गाड्या जप्त केल्या आहेत. कर्जबाजारी व्यवसायसुद्धा बुडाला आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे पैशाची मागणी केली असता ते मेट्रोच्या अधिकाऱ्यांना भेटण्यास सांगतात. मेट्रोकडे पैशाची मागणी केली असता तुमचा आणि मेट्रोशी काही संबंध नाही, तुम्ही कंपनीकडे पैसे मागा सांगून टोलवल्या जात असल्याचे धनंजय ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकाने सांगितले.