Nagpur Metro Tendernama
विदर्भ

मेट्रोच्या ‘डबल डेकर’ पुलाची दखल जागतिक पातळीवर; गिनिज बुकात नोंद

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशनने तयार केलेल्या डबल डेकर पुलाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली असून गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आता त्याची नोंद घेण्यात आली आहे. यापूर्वी आशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या पुलाची आधीच नोंद घेण्यात आली होती.

महामेट्रोच्या वर्धा रोडवरील डबल डेकर व्हाया-डक्टची संपूर्ण जगात मेट्रो श्रेणीतील सर्वात लांब डबल डेकर म्हणून गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. आज (ता.६) मेट्रो भवन येथे आयोजित कार्यक्रमात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांना गिनिज वर्ल्ड रेकॉर्डतर्फे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. लंडन येथे मुख्यालय असलेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे कार्यकारी अधिकारी ऋषी नाथ डॉ. दीक्षित यांना प्रमाणपत्र प्रदान करतील. महामेट्रोने गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदीसाठी अर्ज केला होता. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या भारतातील प्रतिनिधींनी याबाबत सतत पाठपुरावा केला. त्यांनी आपल्या पथकासोबत अभ्यास केला. त्यानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने महामेट्रो चा दावा मान्य करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देण्याची घोषणा केली.

या अतिशय मानाच्या आणि विश्वप्रसिद्ध रेकॉर्डसाठी महामेट्रोच्या प्रकल्पाची निवड होणे ही अभिमानाची बाब आहे. नजीकच्या काळात महामेट्रो यासारखे आणखी काही विक्रम कायम करणार आहे यात शंका नाही. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची मान्यता मिळणे हे महामेट्रोच्या कार्याला उत्कृष्टतेची पावती असल्याची प्रतिक्रिया यावर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित व्यक्त केली.