Nagpur Metro Bridge Tendernama
विदर्भ

Nagpur: जानेवारीत पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : गेल्या अनेक दिवसांपासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या कामठी रोड व सेंट्रल एव्हेन्यू मेट्रो मार्गाचे लोकार्पण येत्या जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. कामठी रोडवरील मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले असून, केवळ डबल डेकर पुलाची किरकोळ कामे शिल्लक आहेत. सेंट्रल एव्हेन्यू मेट्रो मार्ग मात्र पूर्ण तयार झाला आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानपदाखाली ३ ते ७ जानेवारी या कालावधीत विद्यापीठ परिसरात इंडियन सायन्स काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. उद्‍घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. याच दिवशी मेट्रोच्या कामठी रोड व सेंट्रल एव्हेन्यू मार्गिकेचे लोकार्पण करण्याची तयारी महामेट्रोनेही सुरू केली आहे. महामेट्रोने मार्चमध्येच कस्तुरचंद पार्क ते अॅटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशनपर्यंत चाचणी केली आहे. याशिवाय सेंट्रल एव्हेन्यूवरही सीताबर्डी ते प्रजापतीनगर स्टेशनपर्यंत चाचणी घेण्यात आली आहे. कामठी रोडवर मेट्रोच्या ट्रॅकचे काम पूर्ण झाले असले तरी गड्डी गोदाम येथे चार मजली पुलाचे किरकोळ काम शिल्लक आहे. ही कामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत.

मोदी यांची वेळ भेटत नसल्याने मेट्रो रेल्वे सुरू केली जात नसल्याचा आरोप मध्यंतरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. मुद्दामच टेक्निकल कारणे देऊन काम पूर्ण व्हायचे आहे, असे सांगण्यात येते. मात्र मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे. भाजपला महापालिकेच्या निवडणुकीसाठी मोदी यांना बोलावून गाजावाजा करायचा आहे. त्याकरिता मुद्दामच उद्‍घाटनाचा कार्यक्रम लांबणीवर टाकला जात असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. आता मोदी यांनी नागपूरमध्ये होणाऱ्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनाला येण्याची तयारी दर्शवली आहे. ते पुन्हा नागपूरसाठी वेळ देतील याचा काही नेम नाही. त्यामुळे याचा कार्यक्रमासोबत मेट्रो रेल्वेचे उद्घाटनही उरकण्याचा प्रयत्न भाजपतर्फे सुरू आहे.