नागपूर (Nagpur) : नागपूर सुधार प्रन्यासने सुमारे ९२७ कोटी ७५ लाखांचा अर्थसंकल्प सादर केला असून, यात १५० कोटी रुपयांचा निधी घरबांधणीसाठी वापरण्यात येणार आहे. अफॉर्डेबल स्कीम असे नाव देऊन सुधार प्रन्यास फॅल्ट लिलाव करीत असल्याने या सर्व घरकुल योजना श्रीमंतांनाच वाटप केल्या जातात.
ब्रिटीशकाळात टाऊन प्लानिंग करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासची स्थापना करण्यात आली होती. नागपूर महापालिकेच्या निर्मितीनंतरही ही संस्था आजही कार्यरत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुधार प्रन्यास महापालिकेत विलीन करण्याचा प्रयत्न झाला होता. विलनीकरण शेवटच्या टप्प्यात असताना महाविकास आघाडी सरकारने निर्णय फिरविला. अनधिकृत ले-आऊटचे नियमितीकरण, विकास, रस्ते, पाणी आदी सुविधा सुधार प्रन्यासमार्फत केल्या जातात. आमदार आणि खासदार निधीतूनही कामे केली जातात. नागपूर शहराच्या नियोजनबद्ध विकासात सुधार प्रन्यासचा मोठा वाटा आहे. सुधार प्रन्यास एकप्रकारने राज्य शासनाची एजंसी म्हणूनच काम करते. विशेष प्रकल्प याच संस्थेमार्फत राबविले जातात. अधिकाऱ्यांसोबत विश्वस्त म्हणून लोकप्रतिनिधींचाही समितीत समावेश असतो. अनेक लोकप्रतिनिधींना कंत्राटदार, तर कंत्राटदारांना श्रीमंत करण्याचे काम नागपूर सुधार प्रन्यासने केले आहे.
अर्थसंकल्प सादर करताना सुधार प्रन्यासचे अधिकारी आणि विश्वस्त गोरगरिबांसाठी अनेक योजना आणि प्रकल्प जाहीर करतात. सुधार प्रन्यासने आजवर अनेक घरकूल योजना शहरात विकसित केल्या आहेत. शासकीय अनुदानातून या योजन राबविल्या जातात. मात्र त्याची विक्री करताना लिलाव केला जातो. त्यामुळे अफोरडेबल घरकूल योजनाही सर्वसामान्यांना परवडबेल नसतात. नागपूरमध्ये खाजगी कंत्राटदारांनी विकसित केलेल्या स्कीममध्ये मध्यवर्गीयांसाठी टुबीचएके फ्लॅट ३० लाखांच्या घरात सहज उपलब्ध होतात. सुधार प्रन्यासही याच किंमतीत फ्लॅटची विक्री करते. सरकारी जागेवर बांधकाम केल्यानंतरही लाखो रुपयांत फ्लॅटची विक्री होत असल्याने सुधार प्रन्यास चांगलीच श्रीमंत झाली आहे.
नागपूर सुधार प्रन्यासच्याच माध्यमातून पंतप्रधान आवाज योजनांची निर्मिती करण्यात आली. येथील फ्लॅटचे दर निश्तित केले आहेत. मात्र याच संकुलांच्या दर्शनी भागात सुधार प्रन्यासने व्यावसायिक गाळे काढले आहे. लिलावात १० बाय १० चौरस फुटांच्या गाळ्यांची विक्री सरासरी २० लाखांमध्ये झाली आहे. ज्या भागात हे गाळे विकले आहे त्या भागात हजार चौरस फुटांचा मोकळा भूखंड याच किंमतीत सहज उपलब्ध आहे. त्यामुळे सुधार प्रन्यास कंत्राटदारांच्या की सर्व सामान्यांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.