Court Tendernama
विदर्भ

Nagpur : 'या' प्रकरणी डब्ल्यूसीएलच्या दोन अधिकाऱ्यांना कारावास

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूरच्या सीबीआय प्रकरणातील विशेष न्यायाधीशांनी नागपूरच्या सिल्लेवाडा उपविभागात तैनात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे माजी अधिकारी एजाज हुसेन सिद्दीकी यांना 22.95 लाख रुपयांच्या दंडासह सहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांची पत्नी साजिया बेगम हिला 4.50 लाख रुपयांच्या दंडासह चार वर्षे सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.

एबी इनलाइन, सिल्लेवाडा उप विभाग, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (डब्ल्यूसीएल), नागपूर येथील तत्कालीन अधिकारी एजाज हुसेन सिद्दीकी यांनी त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर बेहिशोबी स्थावर -जंगम मालमत्ता बाळगल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध सीबीआयने 1 फेब्रुवारी 2005 रोजी गुन्हा दाखल केला होता. एजाज हुसेन सिद्दीकी यांच्या नावावर आणि त्यांची पत्नी साजिया बेगम यांच्या नावावर 17 लाख 71 हजार 324 रुपये इतकी संपत्ती असल्याचे तपासात उघड झाले आहे, जे त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतांच्या तुलनेत जास्त आहे. तपासाअंती दोन्ही आरोपींविरुद्ध 30 नोव्हेंबर 2006 रोजी नागपूरच्या विशेष न्यायाधीशांसमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले. ट्रायल कोर्टाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवून शिक्षा सुनावली.

अन्य एका प्रकरणात, नागपूरच्या विशेष न्यायाधीशांनी नागपूरच्या डब्ल्यूसीएल मधील तत्कालीन मेकॅनिक फिटर इर्शाद हुसेन सिद्दीकीला 13.65 लाख रुपयांच्या दंडासह पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मे, 1996 ते फेब्रुवारी 2005 या कालावधीत आरोपीने बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याच्या आरोपाखाली सीबीआयने 30 नोव्हेंबर 2006 रोजी नागपूरच्या एबी इनलाइन, सिल्लेवाडा उप विभागातील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड मधील मेकॅनिक फिटर इर्शाद हुसेन सिद्दीकी विरोधात गुन्हा दाखल केला होता. तपासात असे दिसून आले की आरोपीकडे  10 लाख 77 हजार 367 रुपये इतकी संपत्ती होती, जी त्याच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतांच्या तुलनेत जास्त आहे. तपासाअंती आरोपीविरुद्ध 30 जानेवारी 2008 रोजी नागपूरच्या विशेष न्यायाधीशांसमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले. ट्रायल कोर्टाने आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली.