नागपूर (Nagpur) : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फुटाळा तलावात बांधण्यात आलेल्या म्युझिकल फाउंटेनबाबत स्वच्छ फाउंडेशनने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करत निर्णय दिला. गेल्या सुनावणीत महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. ने या ठिकाणी कायमस्वरूपी बांधकाम नसल्याची साक्ष दिली होती. यावरुनच उच्च न्यायालयाने हीच बाब प्रतिज्ञापत्रात नमूद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, गेल्या सुनावणीत हायकोर्टाने याचिकाकर्त्याने मांडलेल्या विविध आक्षेपांवर दिलासा देण्यास नकार दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 ऑगस्टला होणार आहे.
याचिकाकर्त्याने घेतला आक्षेप
फुटाळा येथे बांधण्यात आलेले कारंजे, कृत्रिम वटवृक्ष आणि अन्य प्रकल्पांवर याचिकाकर्त्याकडून आक्षेप घेण्यात आला होता. उच्च न्यायालयाने 5 जुलै रोजी दिलेल्या आदेशात येथे कोणत्याही प्रकारच्या कायमस्वरूपी बांधकामास बंदी घातली होती. कोणत्याही तात्पुरत्या बांधकामामुळे फुटाळा तलावाच्या मुख्य भागाला हानी पोहोचू नये, असे मुख्यत्वे नमूद करून हायकोर्टाने मेट्रोला पाणथळ क्षेत्राशी संबंधित वर्ष 2017 च्या नियम 4 (2) चे पालन करण्याचे आदेश दिले होते.
यासोबतच येथे प्रस्तावित कृत्रिम वटवृक्ष, उपाहारगृहे आदींनी तलावाच्या तळाशी घाण पसरू नये. याप्रकरणी मेट्रोच्या वतीने एड. सुधीर पुराणिक, ऍड. आनंद परचुरे व महापालिकेच्या वतीने एड. जेमिनी कासट यांनी युक्तिवाद केला.