MIDC Tendernama
विदर्भ

Nagpur : नागपूरकरांसाठी Good News; 'ही' मोठी कंपनी करणार दीड हजार कोटींची गुंतवणूक

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूरच्या विस्तारित बुटीबोरी एमआयडीसीत 'सी ग्राम' कंपनी सुमारे दीड ते दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्या वतीने गुरुवारी जागेची पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्यासह हिंगण्याचे आमदार समीर मेघे आणि खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आमदार आशिष जयस्वाल उपस्थित होते.

बुटीबोरीत अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उद्योगाची गरज होती. सी ग्राम कंपनीच्या आगमनाने ती पूर्ण होऊ शकते. प्रारंभिक माहितीनुसार या कंपनीला दीड ते दोन हजार कर्मचाऱ्यांची गरज भासू शकते. कंपनीला सुमारे शंभर एकर जागेची गरज भासणार आहे.

सध्या बुटीबोरीत जागा शिल्लक नाही. त्यामुळे विस्तारित बुटीबोरी एमआयडीसीतील जागा कंपनीच्या प्रतिनिधींना दाखवण्यात आली. सी ग्राम कंपनी नागपूरमध्ये गुंतवणूक करणार हे जवळपास निश्चित आहे. जागा मिळाल्यानंतर कंपनीच्यावतीने आराखडा सादर केला जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

सी ग्राम डिस्टिलरी नावाजलेली कंपनी आहे. ती नागपूरमध्ये आल्यास त्यापाठोपाठ अनेक नव्या कंपन्या येतील आणि मोठ्या प्रमाणात येथे गुंतवणूक होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. अलीकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या एमआयडीसीत जागा नसल्याने विस्तार करण्यात येणार असल्याचे सांगितले. येत्या काळात कोट्यवधीची गुंतवणूक होणार आहे. नागपूर जिल्हा लॉजेस्टिक हब म्हणून विकसित केला जात असल्याचे सांगितले होते.

नागपूरच्या मिहानमध्ये टप्प्याटप्याने गुंतवणूक वाढत आहे. अनेक कंपन्यांनी आपला उद्योग सुरू केला. रामदेव बाबा यांच्या पतंजली संत्रा फळावर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू करणार आहे. त्यामुळे येत्या काळात नागपूरसह विदर्भाच्या उद्योगाला बुस्ट मिळण्याची शक्यता आहे.