Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : Good News! 'या' क्रीडा संकुलात मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा; 683 कोटींचा...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर जिल्ह्याच्या खेळाडूसांठी आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना स्टेडियममध्ये मिळतात त्या सर्व सोई-सुविधा आता नागपूर जिल्ह्यातिल खेळाडूंना मिळणार आहेत.

मानकापूर क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा तसेच वाणिज्यिक सुविधा उभारणीच्या मूळ कामाकरिता 473 कोटी रुपये व विमा, जीएसटी व इतर सेवा शुल्क मिळून एकूण 683 कोटी रुपयांचा आराखडा उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने अंतिम करण्यात आला आहे. हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्धतेसाठी सरकारकडे सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी केल्या.

विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा प्रशिक्षक विजय मुनीश्वर, पीयूष अंबुलकर आदी याप्रसंगी उपस्थित होते. 

नागपूर येथे ऑलिम्पिक व एशियन क्रीडा स्पर्धाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्याच्या कामाला गती मिळण्यासाठी निधी उपलब्धतेनुसार क्रीडा सुविधेची कामे प्राधान्याने करण्याचे व इतर कामे टप्याटप्याने पूर्ण करण्याचे आयुक्त बिदरी यांनी आराखड्याचा आढावा घेताना सांगितले, तर जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सर्व कामे आंतरराष्ट्रीय मानकानुसार समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या.

अंतिम आराखड्यात नेमके काय आहे?

अंतिम आराखड्यानुसार क्रीडा सुविधांचे बळकटीकरण, स्पोर्ट्स क्लब, स्पोर्ट्स सायन्स सेंटर, साहसी क्रीडा प्रकारासाठी सुविधा, अद्ययावत फुटबॉल स्टेडियम, हॉकी अॅस्ट्रोटर्फ, अद्ययावत अॅथलेटिक्स स्टेडियम, टेनिस कोर्ट्स, मल्टीजीम, स्पोर्ट्स एज्युकेशन अॅण्ड इन्फॉर्मेशन सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर, ऑलिम्पिक साइज जलतरण तलाव, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, कुस्ती, आर्चरी, शूटिंग, फेंन्सिग, स्क्वॉश, बॉक्सिंग, ज्युदो, कराटे, तायक्चांदो, टेबल टेनिस, बास्केटबॉल, सॉफ्टबॉल, हँडबॉल, क्रिकेट व आवश्यकतेनुसार इतर खेळांच्या सुविधा, तसेच एकूण 1200 खेळाडूंकरिता निवास व्यवस्था, 700 वाहनांकरिता पार्किंग व त्यावर सोलर विद्युत प्रणाली उभारण्यात येणार आहे.

क्लब हाऊस आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स

क्रीडा सुविधा व सदर संकुल उभारणीनंतर त्याचा व्यवस्थापनाचा खर्च भागवण्यासाठी वापरा व हस्तांतर तत्त्वावर क्लब हाऊस, शॉपिंग कॉम्प्लेक्स, तारांकित हॉटेल, स्पोर्टस् क्लब आदी वाणिज्यिक प्रकल्प उभारण्याचा देखील आराखड्यात समावेश आहे.