Nagpur Vidhanbhavan Tendernama
विदर्भ

Nagpur : भोकरदन-जाफ्राबाद तालुक्यांसाठी गुड न्यूज; 'या' कामांसाठी 55 कोटींचा निधी मंजूर

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील पहिल्याच दिवशी सादर करण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी तब्बल 55 कोटी 45 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे भोकरदन-जाफ्राबाद तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी ग्रामस्थांनी आमदार संतोष दानवे यांच्याकडे मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्त व नियोजन मंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे निधी उपलब्ध करून देण्याबाबात विनंती करण्यात आली होती. या मागणीला प्रतिसाद देऊन 55 कोटी 45 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

त्यापैकी 1 कोटी 99 लाख रुपयांचा निधी भोकरदन येथील तहसिल कार्यालयामधील फर्निचरसाठी स्वतंत्ररित्या मंजूर करण्यात आला आहे. भोकरदन येथे नविन तहसिल कार्यालयाची सुसज्ज अद्यावत इमारत यापूर्वीच बांधण्यात आलेली असली तरी फर्निचर अभावी  कार्यालयीन कामकाजाची गैरसोय होत होती. फर्निचरसाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार तहसिल कार्यालयाच्या फर्निचरसाठी 1 कोटी 99 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या रस्त्यांना सुधारणेसाठी निधी मंजूर : 

- वडोद तांगडा जळकी ते हिसोडा रस्ता व पूल

- लेहा-पारध खु. ते पारध बु. सुटलेला भाग

- भोकरदन-सिल्लोड रोडवरील मुठाड फाटा-तांदुळवाडी ते कोठारा जैनपूर 

- कल्याणी-करजगांव ते कोठाकोळी 

- चिंचोली फाटा - चिंचोली ते जानेफळ 

- शेलुद-लेहा ते वडोद तांगडा फाटा 

- वरुड बु.- कोनड फाटा ते कोनड 

 - सिपोरा अंभोरा ते ब्रम्हपुरी 

- जाफ्राबाद ते चिखली 

- भारज बु-खापरखेडा-गोपी-भराडखेडा ते सावरखेडा