नागपूर (Nagpur) : गेल्या साडेतीन वर्षांपासून बंद असलेल्या रघुजीनगरस्थित कामगार कल्याण केंद्राच्या जलतरण तलावाच्या (Swimming Pool) नूतनीकरणाचे काम सुरू झाले आहे. हे काम दहा महिन्यांत पूर्ण होणार असून, त्यानंतर जलतरण तलाव खुला करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या साथीनंतर मार्च 2020 मध्ये हा तलाव जलतरणपटूंसाठी बंद करण्यात आला होता. तेव्हापासून हा तलाव बंद आहे. दरम्यानच्या काळात निधीअभावी तलावाच्या नुतनीकरणाचे काम ठप्प होते. मात्र शासनाकडून निधी मिळताच हे काम आता मार्गी लागले आहे.
केंद्राचे सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, कित्येक महिन्यांपासून तलाव बंद अवस्थेत असल्यामुळे टाईल्स उखडल्या आहेत. जागोजागी डॅमेज झाले आहेत. टाइल्ससोबतच फिल्टरेशन प्लांट आणि डायव्हिंग बोर्डही खराब झाले. नुतनीकरणासाठी निधी आल्यानंतर तीन जूनला आमदार मोहन मते यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली.
सध्या टाईल्स काढण्याचे व मलबा टाकण्याचे काम सुरू असून, त्यानंतर फिल्टरेशन प्लांट व डायव्हिंग बोर्डची दुरुस्ती आणि सुशोभीकरण केले जाणार आहे. राठोड यांच्या मते, या सर्व कामाला जवळपास दहा महिन्यांचा अवधी लागणार आहे.
नुतनीकरणासाठी शासनातर्फे दोन कोटींचा निधी यापुर्वीच मंजूर झाला असून, यातील एक कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्दही करण्यात आले आहे. नुतनीकरण जवळपास दहा महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच जलतरणपटू प्रॅक्टिस करू शकणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे, मागील साडेतीन वर्षांपासून हा तलाव बंद असल्यामुळे शहरातील विशेषतः पूर्व नागपुरातील शेकडो युवा जलतरणपटूंना प्रॅक्टिससाठी इतरत्र धावाधाव करावी लागत आहे. विशेषतः राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना याचा जबर फटका बसत आहे. त्या सर्वांची प्रतीक्षा लवकरच पूर्ण होणार आहे.
10 महिन्यात होणार काम पूर्ण...
निधीअभावी जवळपास तीन-साडेतीन वर्षांपासून जलतरण तलावाच्या खडले होते. मात्र आता दोन कोटीचा निधी मंजूर झाल्याने नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. डागडुजीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून युवा जलतरणपटूंना आपल्या हक्काच्या तलावावर प्रॅक्टिस करता येईल, अशी माहिती सहाय्यक कल्याण आयुक्त, कामगार कल्याण केंद्रच्या नंदलाल राठोड यांनी दिली.