Nagpur Tendernama
विदर्भ

नागपूर : सव्वा तीन कोटी खर्चूनही तलावाचे बनले डबके; जबाबदार कोण?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : तलावाचे सौंदर्यीकरण होणार, पर्यटनाची सोय होणार, अशी मोठी मोठी स्वप्ने दाखवून सात वर्षांपूर्वी पांढराबोडी तलावाचे काम सुरू करण्यात आले. या कामावर तीन कोटी २८ लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र आजही येथे एक मोठे डबकेच आहे. पश्चिम नागपुरात एकमेव असलेल्या पांढराबोडी तलावाची आज दुर्दशा झाली आहे.

तलावाच्या पुनरुज्जीवनाचे काम २०१४ मध्ये सुरू झाले. राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत पांढराबोडी तलावाच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू करण्यात आले होते. यासाठी राज्य सरकारने ३.३३ कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. राज्य शासनाकडून ७० टक्के तर महापालिकेला ३० टक्के निधी द्यायचा होता. आतापर्यंत या तलावाच्या पुनरुज्जीवनावर ३ कोटी २८ लाख रुपये खर्च झाले. परंतु या तलावाची सद्यस्थिती बघितल्यास येथे कुठलेही काम झाले नसल्याचे दिसून येत आहे. तलावाच्या पूर्वेकडे पाण्याचे एक डबके असून निम्म्यापेक्षा जास्त तलाव कोरडा आहे. याशिवाय तलावामध्ये बेशरम, तसेच काटेरी झुडपे वाढली असून, डुकरांचा वावर दिसून येत आहे. तलावाच्या किनाऱ्यावर परिसरातील नागरिकांनी कचराघर तयार केले आहे. येथेच बाभळीचे वन तयार झाले आहे.

सव्वातीन कोटी रुपये खर्च केल्यानंतर तलावाची दुर्दशा बघता यात भ्रष्टाचाराचे तण वाढल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे बाजूलाच लागून असलेल्या झोपडपट्टीतील नागरिक येथे कचरा टाकत आहेत. या तलावाची कामे करताना भोसलेकालीन तोफही आढळून आली होती. ही तोफ पर्यटकांसाठी येथेच लावण्यात येणार होती. परंतु पुढे या तलावाचे कामच बंद पडले. गेल्या सहा वर्षापासून या तलावाचे काम रखडले आहे.

भूमीपूजन करणारे झाले आमदार
या तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी २०१४ मध्ये भूमीपूजन करण्यात आले. तत्कालीन नगरसेवक परिणय फुके यांनी हा कार्यक्रम घेतला होता. विशेष म्हणजे या तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. ते आमदार झाले. परंतु तलावाची स्थिती मात्र जैसे-थेच आहे.