नागपूर (कन्हान) : नागपूर जिल्ह्यातील कन्हान नगरपालिका (KMC) नेहमीच वेगवेगळ्या घोटाळ्यांबाबत चर्चेत असते. आता पुन्हा एकदा 27 लाख 75 हजार रक्कम देऊन खरेदी केलेल्या ई-रिक्षा घोटाळ्याची नवी माहिती समोर आली आहे. कन्हान नपच्या नगरसेवकांनी आणि नगर परिषद अध्यक्षांनीच कचरा संकलन करणाऱ्या ई-रिक्षा लो क्वालिटीच्या असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. कारण पहिल्याच दिवशी कचरा संकलन करण्यासाठी ई-रिक्षा शहरात गेला असता, कचऱ्याचे ओझ झाल्यामुळे ई-रिक्षा पुढे गेलीच नाही. तेव्हापासून सर्वच गाड्या नगर पालिकेच्या आवारात उभ्या आहेत.
कन्हान येथील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात व कन्हान कचरामुक्त व्हावा या उद्देशाने ई-रिक्षा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी 22 जून 2022 ते 2 जुलै या कालावधीत टेंडर मागविण्यात आल्या होत्या. याबाबत एकूण 4 कंत्राटदारांनी टेंडर भरल्या होत्या आणि 2 जुलै 2022 रोजी उघडण्यात आल्या होत्या.4 जुलै रोजी टेंडरधारकाच्या आर्थिक बोलीचे लिफाफे उघडल्यानंतर टेंडर मेघदूत एन्टरप्रायझेसला वाटप करण्यात आली होती. भाजपचे नगरसेवक राजेंद्र शेंद्रे आणि भाजपच्या नगरसेविका वर्षा लोढे यांनी बैठकीत सूचनेला अनुमोदन दिले.
टेंडरनुसार मेघदूत एन्टरप्रायझेस भंडारातर्फे एकूण 6 ई-रिक्षांची 30 लाख 6 हजार रुपयांची बोली लावण्यात आली. या रकमेची वाटाघाटी करण्यात आली. त्यानंतर मेघदूत एन्टरप्रायझेस भंडारा तर्फे सर्व 6 ई-रिक्षा कन्हान नपकडे सुपूर्द करण्यात आल्या. कन्हान नपमध्ये ई-रिक्षा आल्यानंतर कन्हानमधील नागरिक आणि नगरसेवक आनंदी झाले. परंतू त्यांचा आनंदाला पहिल्याच दिवशी दृष्ट लागली आणि ई-रिक्षा खरेदीतील भ्रष्टाचार उघडकीस आला. तेव्हापासून सर्व 6 ई-रिक्षा कन्हान नपच्या नवीन इमारतीत बंद ठेवण्यात आल्या आहेत.
या भागात निर्माण होणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कन्हान नपच्या घोटाळ्यांच्या यादीत कचऱ्याचा प्रमुख स्थान असून गाडेघाट रोडवर असलेल्या कचरा प्रक्रिया युनिटमध्ये किती प्रक्रिया केली जात आहे, हे सर्व कन्हान नप 16 नगरसेवक व अध्यक्ष आणि मुख्याधिकारी पण सहज पाहू शकतात.
या संदर्भात लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे विरोधी पक्षातील काही नगरसेवकांनी या ई-रिक्षाला विरोध केला, मात्र भाजप-शिंदे गट-काँग्रेस नगरसेवकांच्या समोर सगळ्यांची बोलती बंद झाली. मेघदूत एन्टरप्रायझेस भंडारा यांना बिल अदा केले, सध्या स्थितित मेघदूत एन्टरप्रायझेसने पुरवलेली ई-रिक्षा मध्यवर्ती कारागृहातील कैद्याप्रमाणे कन्हान नपच्या नवीन इमारतीत शिक्षा भोगत आहे.