Ravibhavan Tendernama
विदर्भ

Nagpur: 'रविभवना'तील कॉटेज, सुटवर लाखोंची उधळपट्टी कशासाठी?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनासाठी (Winter Session) विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कामांवर 65 कोटींच्या जवळपास निधी खर्च करण्यात आला. काही ठिकाणी करण्यात आलेल्या कामावर निधीची उधळण करण्यात आल्याचे टीका होत आहे.

रविभवन येथील 5 मंत्री कॉटेज व 12 सुटच्या देखभाल दुरुस्तीवर 28 लाखांवर खर्च करण्यात आला. वर्षभर चहल पहल असून, त्याचा वापर होत असतानाही त्यावर एवढी मोठी रक्कम खर्च करण्यात आल्याने मोठा आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

हिवाळी अधिवेशन डिसेंबर 2022 मध्ये झाले. दोन वर्षानंतर अधिवेशन झाले. त्यापूर्वीच्या वर्षात अधिवेशन ऐनवेळेवर टाळून मुंबईला घेण्यात आले. याच्यासाठी कोरोनाचे कारण पुढे करण्यात आले होते. मागील वर्षी नागपूरला अधिवेशन झाले.

या अधिवेशनातून प्रत्यक्ष विदर्भ व महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले, हा चर्चेचा भाग आहे. परंतु या अधिवेशनासाठी शेकडो कोटी खर्च झाल्याचे बोलल्या जात आहे. बांधकाम विभागाकडून 95 कोटींच्या खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला होता. कंत्राटदारांकडून कमी दराचे टेंडर सादर केल्याने 65 कोटींच्यावर खर्च झाल्याची माहिती आहे.

बांधकाम विभागाचा आराखडाचा आणि कामावर करण्यात आलेला खर्च वादात सापडण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात विभागाकडून तयार करण्यात आलेले इस्टिमेट आणि कंत्राटदारांकडून ते घेण्यात आलेले काम यात बरीच तफावत आहे. काही कामावर लक्ष दिल्यावर अनेकांच्या भुवयाच उंचावल्या.

रविभवन येथील 5 मंत्री कॉटेजच्या देखभाल दुरुस्तीवर 15 लाख 61 हजार, तर 12 सुटच्या देखभाल दुरुस्तीवर 12 लाख 66 हजार रुपये खर्च करण्यात आले. आयुक्त कार्यालय व प्रशासकीय इमारत 1 व 2 येथेल पाणी टाकी परिसरातील सफाई व इतर किरकोळ कामांवर 10 लाख 10 हजार रुपये खर्च करण्यात आल्याचे सुदर्शन गोडघाटे यांना माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीतून पुढे आले. 

असा झाला खर्च...

रविभवनमधील 12 सुट दुरुस्ती 

इस्टिमेट ः 20 लाख 75 हजार 138 रुपये 

38.99 टक्के बिलो टेंडर ः प्रत्यक्ष खर्च 12 लाख 66 हजार 041

आयुक्त कार्यालय व प्रशासकीय इमारत 1 व 2

पाणी टॅंक परिसरातील सफाई इतर किरकोळ कामे 

सचिव कार्यालय सीई कार्यालयाजवळील दुरुस्ती, रंगरंगोटी 

इस्टिमेट ः 16 लाख 87 हजार 394 रुपये 

40. 11 टक्के बिलो टेंडर ः प्रत्यक्ष खर्च 10 लाख 10 हजार 580 रुपये 

5 मंत्री कॉटेज दुरुस्ती 

इस्टिमेट ः 24 लाख 58 हजार 820 रुपये 

36.51 टक्के बिलो टेंडर ः प्रत्यक्ष खर्च 15 लाख 61 हजार 104 रुपये