Bus Tendernama
विदर्भ

सावधान! नागपूर महापालिकेच्या बसमध्ये बसताय? दोन महिन्यांत तिसरी...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर महापालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) परिवहन विभागाच्या 'आपल्या बस'ने दोन महिन्यांत तिसऱ्यांदा पेट घेतला. बसने पेट घेतला त्या वेळी ३५ प्रवाशी या बसमधून प्रवास करत होते. सुदैवाने सर्व प्रवासी बचावले असले तरी दोन महिन्यांत तिसऱ्यांदा अशी घटना घडली आहे. त्यामुळे या बस गाड्यांच्या देखाभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेला खाजगी बस ऑपरेटर काय करत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिकेच्या परिवहन विभागाची एमएच-३१ सीए ६०१० या क्रमांकाची बस सीताबर्डीतून खापरखेड्याकडे जाण्यास निघाली. सीताबर्डीतून दोन किमी अंतरही गाठले नाही, तोच संविधान चौकात या धावत्या बसने पेट घेतला अन् एकच खळबळ उडाली. बसने पेट घेतल्याने खापरखेड्याला नोकरीसाठी जाणारे कर्मचारी, शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांत थरकाप उडाला. चालक किशोर भूते व वाहक गौरव कांबळे यांनी आगीची चाहूल लागताच प्रवाशांना तातडीने बसमधून बाहेर काढले. इंजिनमध्ये आग लागल्याचे दिसताच बसच्या दोन्ही प्रवेशद्वांरातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या परिसरातील वाहतूक पोलिस, नागरिकांनीही प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. चालक व वाहकांच्या प्रसंगावधनामुळे ३५ प्रवाशांचा जीव वाचला. परंतु, अनेक प्रवासी घटनेनंतर काही वेळ दहशतीत दिसून आले.

बसमधील फोमच्या गाद्यांमुळे आग संपूर्ण बसमध्ये पसरली. दहा मिनिटांत संपूर्ण बसला आगीने कवेत घेतले. दरम्यान, जवळच असलेल्या महापालिकेच्या सिव्हिल लाईन अग्निशमन केंद्रावरून तत्काळ दोन बंब आले. अग्निशमन जवानांनी पाण्याचा माऱ्याचा मारा करत आग विझवली. परंतु संपूर्ण बसचा कोळसा झाल्याचे दिसून आले. आग विझविल्यानंतर बसचे केवळ टिनाचे पत्रे शिल्लक दिसून आले. जळालेल्या या बसमुळे तेथेच थांबलेल्या प्रवाशांतही भीतीचे वातावरण होते. गेल्या दोन महिन्यांत धावत्या बसला आग लागण्याची ही तिसरी घटना आहे. या घटनेमुळे खाजगी ऑपरटेरने देखभाल, दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून, नागपूरकरांचा जीव धोक्यात घातला असल्याचे दिसून येत आहे.

तीन घटनांत १३५ प्रवासी बचावले

धावत्या बसला आग लागल्याची मार्चपासूनची ही तिसरी घटना आहे. ८ मार्चला गिट्टीखदान येथे 'आपली बस'च्या ताफ्यातील एमएच ३१ सीए ६१०२ क्रमांकाची बस जळाली. या बसमधील ५५ प्रवाशांचा जीव वाचला. ३१ मार्चला सकाळी पावणेदहा वाजताच्या सुमारास मेडिकल चौकातील संगम हॉटेलजवळ एमएच ३१ एससी ०४१३ क्रमांकाच्या बसला आग लागली. यातून ४५ प्रवाशांचा जीव वाचला तर आज ३५ प्रवासी बचावले.

बॅटरीतून स्पार्क?

बसला आग लागण्याची अनेक कारणे आहेत. यात बॅटरीतून स्पार्क निघत असताना त्यावर ऑईल पडल्याने आग लागण्याची शक्यता असल्याचे ट्रान्सपोर्ट व्यवसाय व दुरुस्ती करणाऱ्या तज्ज्ञांनी सांगितले. शिवाय वाढलेल्या तापमानात लहान स्पार्कही धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे बॅटरीची तपासणी करण्याची गरज असल्याचेही या तज्ज्ञाने सांगितले.

अग्निशमन विभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष

३१ मार्चला बसला आग लागल्यानंतर मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी उपायुक्त व वाहतूक व्यवस्थापक रविंद्र भेलावे यांना लिहिलेल्या पत्रातून केली होती. इंजिन अति उष्ण होऊ नये, यासाठी ऑईल तसेच कूलंटची तपासणी नियमित करण्याची सूचना त्यांंनी केली होती. प्रत्येक बसमध्ये अग्निशमन यंत्रणा आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले होते. परंतु या सूचनाही हवेत उडविण्यात आल्याचे दिसून येत आहे.