Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : 24 दुकाने जमीनदोस्त; नवीन केबल-स्टेड ब्रिजचा मार्ग मोकळा

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : कांबळे स्क्वेअर ते अजनी रेल्वे ओव्हरब्रिज (RoB) पर्यंत पसरलेली सुमारे 24 दुकाने बुधवारी विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रस्तावित नवीन 8 लेनच्या केबल-स्टेड ब्रिजसाठी मार्ग काढण्यासाठी जमीनदोस्त केली. दोन महिन्यांपूर्वी, मध्य रेल्वेच्या (Central Railway) नागपूर विभागाने (Nagpur Division) दुकानदाराला दुकानाचे भाडे रद्द करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या आणि रिकामे करण्यासाठी मुदत दिली होती. ही मुदत एक महिना वाढली आणि अखेर दुकाने जमीनदोस्त करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून, दुकानदारांनी जागा रिकामी करण्यास सुरवात केली होती. साहित्य आणि मशीन्स इतर ठिकाणी हलवण्यास सुरवात केली होती. कारण रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी आता आणखी मुदतवाढ शक्य नाही, असे सांगितले होते. 

बुधवार 8 फेब्रूवारी 2023 ला सकाळपासून, स्थानिक रेल्वे-मार्गाच्या अधिकाऱ्यांनी अर्ध-पक्की संरचना पाडण्यासाठी मोठमोठी यंत्रे तैनात केली. त्यानंतर एकामागून एक दुकाने फोडण्यास सुरुवात केली. पाडकामाची कारवाई बिनदिक्कतपणे सुरू राहावी यासाठी स्थानिक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमनासाठी व्यवस्था केली होती. तीन तासांहून अधिक काम केल्यानंतर, कांबळे स्क्वेअर ते आरओबीपर्यंतच्या रस्त्यावर केवळ डेब्रिज उरला होता.

आता फक्त पोलिस उपायुक्त परिमंडळ-4 आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या अजनी विभागाच्या इमारतीचे निवासस्थान रस्त्यावर उरले आहे आणि त्यालाही जागा रिकामी करण्याची नोटीस बजावली. त्यांच्या पर्यायी कार्यालयाची जागा निश्चित झाल्यावर ती इमारतही पाडण्यात येणार आहे. त्यानंतर अजनी रेल्वे कॉलनीतील एक बागही काढून जमिनीच्या सपाटीकरणासाठी आणि पायाभूत काम सुरू करण्यासाठी मार्ग मोकळा करावा लागणार आहे.

एमआरआयडीसीएल नवीन 8 पदरी केबल स्टेड पुलाच्या बांधकामाचे कंत्राट देण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. नोव्हेंबर महिन्यात टेंडर काढण्यात आली होती आणि सध्या एमआरडीआयसीएलचे अधिकारी बिडची छाननी करण्यात व्यस्त आहेत आणि लवकरच कराराला अंतिम रूप दिले जाईल.

योजनेनुसार, पहिल्या टप्प्यात, सध्याच्या अजनी आरओबीला लागून दक्षिणेकडील बाजूस चार पदरी पूल बांधण्यात येणार आहे. नवीन आरओबीचा एक मार्ग कांबळे स्क्वेअरपासून सुरू होईल आणि त्याचे लँडिंग पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाजवळ किंवा चुनाभट्टीजवळ असू शकते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात काँग्रेस नगरला अजनी रेल्वे कॉलनीशी जोडणाऱ्या नवीन फोरलेन केबल स्टेड ब्रिजचे बांधकाम सक्षम करण्यासाठी जुना ROB पाडण्यात येईल.