Rojgar Hami Yojana Tendernama
विदर्भ

Nagpur: भंडाऱ्यात ग्रामीण रोजगार हमी योजना का ठरली फ्लॉप?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (Gramin Rojgar Hami Yojana) 2022-23च्या वार्षिक नियोजनात पंचायत समितीस्तरावर भंडाऱ्यातील 29 हजार 148 कामांचा समावेश आहे. त्यावर 23 हजार 255 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या पासून 46 लाख 71 हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे. या योजनेचा मूळ उद्देश मजुरांना वर्षातून 100 दिवस रोजगार उपलब्ध करणे आहे. मात्र फेब्रुवारीतील आठवडा निघून गेला असला तरी आणि मार्चमध्ये योजना संपुष्टात येत असल्याने मजुरांना 100 दिवस रोजगार देण्याचा सरकारचा उद्देश सफल होणार का या प्रश्नाचे उत्तर पंचायत समिती प्रशासनाकडेही नाही. 

ग्रामीण भागातील दारिद्य्र रेषेखालील व गरीब कुटुंबातील एका व्यक्तीला वर्षातून 100 दिवस रोजगार उपलब्ध करण्याच्या उदात्त हेतूने केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेस सुरवात केली. ती महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने राज्यात सुरू आहे. या योजनेचा केंद्रबिंदू ग्रामीण परिसर असल्यामुळे नियोजन, सनियंत्रण व अंमलबजावणीची जबाबदारी ग्रामपंचायतीची असून, यासाठी ग्रामसेवकाच्या मदतीस रोजगार सेवकाची मानधनावर नियुक्ती करण्यात आली आहे. कामे सुचारू पद्धतीने चालावी याकरिता पंचायत समितीस्तरावर 'मग्रारोहयो'चा स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला असून, कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर देखरेख व सनियंत्रणाचे काम गटविकास अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आले आहे. 

भंडारा तालुक्यात 71 ग्रामपंचायतीत 104 गावे समाविष्ट असून, 94 लोकवस्तीची गावे आहेत. लोकसंख्या 1 लाख 28 हजार 554 आहे. कुटुंबसंख्या 25 हजार 499, मजूर संख्या 66 हजार 369 तर दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांची संख्या 17 हजार 140 आहे. 

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना 2022-23च्या वार्षिक नियोजनात सिंचन विहिरी 888, मामा तलाव 255, सिमेंट बंधारा, गाळ काढणे 235, कालव्यातील गाळ काढणे/पाट 180, नाला सरळीकरण 169, शेत तळे 174, भुसुधार/भातखचरे 2 हजार 795, वृक्ष लागवड संगोपन 512, फळबाग लागवड 1 हजार 379, कुक्कुट पालन शेड 877, गुरांचा गोठा 3 हजार 415, शेळ्यांचा गोठा 1 हजार 277, शोष खड्डे 13 हजार 384, विहीर पुनर्भरण खड्डे 131, नांडेप खत खड्डे 500, गांडूळ खत खड्डे 323 याचा समावेश आहे.

मत्स्य संवर्धन तळी 6, पानंद रस्ते 511, गाव अंतर्गत रस्ते 327, शेतकऱ्याच्या संमतीने शेताला जोडणारे नवीन रस्ते 42, घरकुल 21, अंगणवाडी 29, राजीव गांधी सेवा केंद्र 10, स्मशानभूमी सपाटीकरण/सौंदर्यकरण 22, शाळेचे क्रीडांगण सपाटीकरण 28, वैयक्तिक शौचालय 721 व इतर कामे 927 असे एकूण 29 हजार 148 कामाचा वार्षिक नियोजनात समावेश केला आहे. त्यावर 23 हजार 255 लाख रुपये खर्च होणार असून 46 लाख 71 हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होणार आहे. 

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत 60 टक्के अकुशल (मजूर प्रधान) आणि 40 टक्के कुशल (बांधकाम) कामांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष संपण्यास दीड महिना बाकी असून सध्या फेब्रुवारीचा एक आठवडाही संपला आहे. पण वार्षिक नियोजनात समाविष्ट कामांचे अंदाजपत्रक तयार केले गेले नाही किंवा मागील आर्थिक वर्षातील अपूर्ण कामांना सुरवात केली गेली नाही. त्यामुळे शासनाचा मजुरांना 100 दिवस रोजगार उपलब्ध करणे शक्य होईल काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. पंचायत समिती प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून मजूर प्रधान कामे तत्काळ सुरू करून मजुरांना काम उपलब्ध करून देणे आवश्यक बनले आहे.