Cable Stayed Bridge Ajani  Tendernama
विदर्भ

Nagpur : अजनीतील 333 कोटींच्या 'या' पुलाकडे तुम्ही पाहातच राहाल

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर रेल्वे स्थानकाजवळ (Nagpur Railway Station) बांधण्यात आलेल्या राम झुलाप्रमाणेच आता अजनी रेल्वे स्थानकाजवळ (Ajani Railway Station) 333 कोटी खर्च करून लक्ष्मण झुला बांधण्यात येणार आहे. त्यासाठी माती परीक्षण सुरू झाले आहे. 

जुना पूल 2 महिन्यांत पाडता येईल. येथे सहा पदरी पुलाचे काम दोन टप्प्यांत केले जाणार आहे.  यासाठी वाहतूक आणि गाड्यांच्या व्यवस्थेवर पूर्ण लक्ष दिले जाणार आहे. या प्रकल्पाची किंमत 333 कोटी रुपये आहे. अजनी ते मेडिकल चौक हा 283 मीटर लांबीचा पूल 21 महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, पुलाला रंगीबेरंगी दिव्यांनी सजवण्याची योजना आहे.

पूलाच्या बांधकामासाठी अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाची होती. त्यामुळे मध्य रेल्वे नागपूरने दुकानदारांना नोटीस देऊन जागा रिकामी केली. पूलाचे रेखाचित्र मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने तयार केले आहे. अभियांत्रिकी विभागाच्या विविध अधिकाऱ्यांकडून रेखाचित्राची छाननी केली जात आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

स्टेड ब्रिजचे कंत्राट महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला देण्यात आले आहे. हा सहा पदरी पूल दोन टप्प्यात बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात एका बाजूने तर दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या बाजूने काम केले जाणार आहे.

जुना पूल पाडण्याचे नियोजन केले जात आहे. पूल तोडताना गाड्यांवर होणारा परिणाम, धूळ निर्माण आणि प्रदूषण याचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाईल.

जीर्णावस्थेत जुना पूल

अजनी पूल जीर्ण झाला असून, पुलाची व्हॅलेडिटीही संपली आहे. या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गाचा नियमित वापर करणाऱ्या दुचाकीस्वारांनी पूल ओलांडताना धक्का लागल्याची तक्रार केली आहे. नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. दक्षिण नागपुरातील नागरिकांसाठी हा सर्वांत जवळचा मार्ग असल्याने या पुलावर सकाळ संध्याकाळ वाहनांच्या रांगा लागतात.

नागपुरातील राम-लक्ष्मण स्टेडियम पूल

ब्रिटीश काळात बांधलेला कोलकाता हावडा ब्रिज देशात प्रसिद्ध आहे. यानंतर उपराजधानी नागपूर शहरात प्रथमच राम झुला स्टेड ब्रिज बांधण्यात आला. आता अजनीमध्ये स्टीड ब्रिज बांधण्यात येणार आहे. या पुलाला ‘लक्ष्मण झुला’ असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने देशात प्रथमच केवळ नागपुरात ‘राम-लक्ष्मण स्टेडियम पूल’ बांधण्यात येणार आहे.