Airport Tendernama
विदर्भ

Nagpur Airport News : बावनकुळेंचे ऐकले नाही; नागपूर विमानतळाच्या 'या' कामासाठी लवकरच टेंडर

टेंडरनामा ब्युरो

Nagpur News नागपूर : नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Dr. Babasaheb Ambedkar International Airport) धावपट्टीचे रिकार्पेट काम सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. हे काम हिवाळ्यात पूर्ण केले जाईल. विशेष म्हणजे, धावपट्टी रिकार्पेट करण्याचे काम पावसाळ्यानंतर करण्यात यावे, अशी विनंती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिहानच्या अधिकाऱ्यांना केली होती. 

16 जून 2024 रोजी झालेल्या बैठकीत विमानतळ प्राधिकरण तसेच कंत्राटदार कंपनीने विमानतळाच्या रनवे रि-कार्पेटिंग कामाबाबत चर्चा करून हिवाळ्यात हे काम करण्याचे ठरविले आहे. याबाबत आवश्यक असणाऱ्या सुरक्षात्मक कार्यवाही केली जात आहेत. मिहान इंडिया लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर विमानतळाच्या धावपट्टी दुरुस्तीसाठी 19 जून 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये चर्चा झाली होती. त्यावेळी विमानतळाच्या धावपट्टी रि-कार्पेट करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे काम 2024 च्या उन्हाळ्यात करण्यात येणार असल्याची माहिती विमान वाहतूक कंपन्यांना दिली होती. त्यानुसार विमान कंपन्यानी देखील काही सूचना केल्या होत्या. त्यानंतर, एप्रिल 2024 मध्ये धावपट्टीच्या दुरुस्तीकामाला सुरुवात झाली, तथापि काही कारणास्तव कामाला उशीर झाला. 

पावसाळ्यात दुरुस्तीचे काम शक्य नसल्याने नंतर काम सुरू करण्याचा निश्चय करण्यात आला. त्यामुळे 15 सप्टेंबर 2024 पर्यंत विमान कंपन्या आपले परिचालन सुरू ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. 15 सप्टेंबर 2024 पासून धावट्टीच्या दुरुस्ती काम सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत आवश्यक असणाऱ्या काही प्रक्रियांची मंजुरी घेतली जात आहे. विमानतळाच्या कामाबाबत बावनकुळे यांनी पुढाकार घेतल्याने प्रवाशी व विमान वाहतूक कंपन्यांच्या अडचणी सुटल्या आहेत.

विमानतळाच्या रनवे रि-कार्पेटिंग कामासाठी लहान-मोठे टेंडर काढण्यात येणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात काम सुरू करण्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. तर प्रवाशांना कामामुळे कोणतेही त्रास होणार नाही याची सुद्धा दक्षता घेतली जाणार आहे.