Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : 'एम्स'च्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकसाठी मिळेल 50 एकर जागा?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : मिहानमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) झपाट्याने प्रगती करत आहे. वाटचाल सुरू आहे. 'एम्स'मध्ये 'डीएम' व 'एमसीएच' हे सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आणखी 50 एकर जागेची मागणी केली आहे, अशी माहिती एम्सचे अध्यक्ष माजी खा. पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी दिली. डॉ. महात्मे यांची एम्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल  पत्रकार क्लब ऑफ नागपूरच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. 

महात्मे यांनी सांगितले की, 'एम्स'मध्ये किडनी ट्रान्सप्लांट, हृदय ट्रान्सप्लांट व बोनमॅरो ट्रान्सप्लांट सुरू झाले आहेत. लवकरच लिव्हर ट्रान्सप्लांट सुरू होणार आहे. यासोबतच 'असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी' (एआरटी), 'स्लीप लॅब' आणि कॉक्लिअर इम्प्लांट' ऑगस्ट महिन्यात सुरू होणार आहे. याचा फायदा रुग्णांना होईल. इमर्जन्सी बेडची संख्या 36 पर्यंत वाढवली 'एम्स'च्या बाह्यरुग्ण विभागात रोज 2800 ते 3000 रुग्ण येतात. आंतररुग्ण विभागात 100 ते 120 रुग्ण येतात. दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. सध्या 'एम्स'मध्ये 820 बेड आहेत. यातील जवळपास 92 टक्के बेड फुल्ल असतात. आयसीयूमधील बेड हे 100 टक्के फुल्ल असतात. आपत्कालीन विभागातील (इमर्जन्सी) बेडची संख्या 36 पर्यंत वाढविण्यात आली आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता अतिरिक्त 14 बेड तात्पुरत्या आधारावर सुरू केले आहेत.

2020 पासून मेडिकल ऑन्कोलॉजिस्टचे पद रिक्त : 

डॉ. महात्मे यांनी सांगितले की, 2020 मध्ये मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट पदासाठी जाहिरात दिली होती. अद्यापही हे पद रिक्त आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये मोठे पॅकेज मिळत असल्याने 'एम्स'ला तज्ज्ञ डॉक्टर मिळत नाही. कंत्राटी पद्धतीवर डॉक्टरांची नियुक्त्ती करता येत नाही. परंतु, लवकरच यातून मार्ग काढला जाईल.

नर्सची 50 टक्के पदे रिक्त : 

डॉ. जोशी म्हणाले, एम्समध्ये 820 बेडच्या तुलनेत 1000 नर्सेसच्या पदांना मंजुरी प्राप्त आहे. परंतु, 520 जागा भरण्यात आल्या आहेत. लवकरच रिक्त जागा भरल्या जातील. रुग्णांची बेडसाठी धावाधाव थांबविण्यासाठी मेयो, मेडिकल व एम्समधील रिकाम्या बेडची माहिती रुग्णांना मिळण्यासाठी लवकरच एक योजना हाती घेतली जाईल. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून ती अमलात आणली जाईल, अशी माहितीही डॉ. महात्मे यांनी दिली. यावेळी एम्स चे संचालक डॉ. पी. पी. जोशी, भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. गिरीष चरडे, पत्रकार क्लब ऑफ नागपूरचे अध्यक्ष प्रदीप मैत्र व सचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी उपस्थित होते.