Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : गडकरींच्या आदेशानंतर सुत्रे हालली अन् 23 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कामाला मुहूर्त

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : मध्य नागपुरातून जाणाऱ्या जुन्या भंडारा रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामाला रविवारपासून सुरवात झाली. मेयो हॉस्पिटल चौकातून बांधकामाची प्राथमिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सुनील हॉटेल चौकापर्यंत हा रस्ता वाढवण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी संबंधित विभागांची बैठक घेऊन काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर 23 जुलै रोजी त्याचे भूमिपूजन करण्यात आले. बांधकामाचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. भूमिपूजनानंतर 21 दिवसांनी या कामाला सुरवात करण्यात आली आहे.

विस्तारीकरणास मान्यता

शासनाने 7 जानेवारी 2000 रोजी शहरातील 45 डीपी रोडच्या विस्तारीकरणास मान्यता दिली होती. यातील एक जुना भंडारा रोड होता. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मध्य नागपूर विकास आघाडीचे अध्यक्ष भूषण दडवे आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष रवींद्र पायगवार यांनी 2014 मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने तीन महिन्यांत रस्त्याचे काम सुरू करण्यास सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्थानिक नगरसेवक आणि जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर सोबत बैठक घेऊन रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेश दिले. यासाठी केंद्र शासनाकडून 100 कोटी रुपये, राज्य शासनाकडून 237 कोटी 30 लाख रुपये आणि महापालिकेकडून 101 कोटी 70 लाख रुपये असा एकूण 339 कोटी रुपये निधीतून हा रस्ता तयार करण्यात येणार आहे.

नेहमीच असायची कोंडी

या रस्त्यावर बाराही महिने ट्रॅफिक राहत असे. म्हणून मागील 23 वर्षापासून या रस्त्याचे विस्तारीकरण करण्याची मागणी केली जात होती. या रस्त्यावर आले की येथे कमीत कमी 3-4 तास कोंडी व्हायची. आता लवकरच या रास्त्याचा विस्तार होणार आहे त्यामुळे नेहमीच्या ट्रॅफिकच्या समस्येतून लोकांना मुक्ती मिळणार आहे.