Ramtek Tendernama
विदर्भ

Nagpur : रामटेकमधील शेतकऱ्यांना 23 वर्षांनंतर मिळाली 'ही' Good News!

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : 2001 मध्येच प्रशासकीय मान्यता मिळालेल्या सत्रापूर कालव्याचे काम अखेर 23 वर्षांनंतर पूर्ण झाले आहे. रामटेक (Ramtek) तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार असून, डाव्या कालव्यातून तब्बल 1441 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. पेंच प्रकल्पावर ही उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे. (Good News for Farmers)

माजी मंत्री दिवंगत मधुकर परीकर यांचा हा 'ड्रीम प्रोजेक्ट' होता. प्रकल्पाची पाहणी ते प्रशासकीय मान्यता मिळवण्यापर्यंत त्यांनी अथक प्रयत्न केले. दरम्यानच्या काळात अनेक प्रकारचे अडथळे आले होते. पण, आता दोन्ही कालव्याचे काम पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. पेंच प्रकल्पांतर्गत, तिरलाघाट जवळील सत्रापूर गावाजवळून 16.525 दलघमी पाणी डाव्या कालव्यात प्रत्येकी 425 अश्वशक्तीचे तीन पंप वापरून वळवले जाईल. ते 840 मिमी आणि 1200 मिमी व्यासाच्या ऊर्ध्वनलिकेच्या पाईप्सद्वारे पाण्याचा उपसा केला जाईल आणि ते जलपर्णीकडे नेले जाईल.

या योजनेला 2001 मध्येच शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली होती आणि त्यावेळी त्याची किंमत 3878 कोटी रुपये होती. 2022 मध्ये सुधारित खर्च 12341 कोटी रुपये झाला. या प्रकल्पामुळे 3,930 हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. यामध्ये रामटेक तालुक्यातील सिंचनाचा व तालुक्यातील 24 गावांनाही शेतीसाठी सिंचनाचा लाभ मिळणार आहे. मुख्य कालव्याची लांबी 6.54 किमी असून त्यांचे काम पूर्ण झाले आहे.

ग्रामस्थांचा आक्षेप दूर 

डाव्या कालव्याच्या संदर्भात बोर्डा येथील शेतकरी आणि स्थानिक रहिवाशांना आक्षेप होता. काहीवेळा कालव्याचे कामही बंद पाडण्यात आले होते. पण, आता आक्षेप दूर करण्यात आले असून डावा कालवाही सुरू झाला आहे. या कालव्याची लांबी 13.36 किलोमीटर आहे. या कालव्यामुळे 1442 हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.

वीजबिल ही मोठी समस्या

शेतकऱ्यांपुढे वीजबिल ही मोठी समस्या आहे. मुख्यमंत्री कृषी वाहिनी किंवा अन्य योजनांच्या माध्यमातून सौरऊर्जा पार्क उभारून वीज बिलांच्या समस्येतून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन आमदार आशिष जयस्वाल यांनी दिले. त्यांनी महाराजपूर, गुडेगाव, मुसेवाडी परिसरातील कालव्याची पाहणी करून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी किशोर रहांगडाले, कांतीलाल पटेल, धनराज रहांगडाले उपस्थित होते.