government medical college nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : 'मेडिकल'च्या विकासासाठी 514 कोटींचा निधी; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार अमृत महोत्सवाचे उद्घाटन

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ 1 डिसेंबर रोजी संस्थेचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

मेडिकल डीन डॉ. राज गजभिये यांनी सांगितले की, भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते 1947 मध्ये मेडिकलची स्थापना करण्यात आली. नागपूर मेडिकल ही मध्य भारतातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य संस्था आहे. सुपर स्पेशालिटी विभागाचे उद्घाटन 1995 साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकरदयाल शर्मा यांच्या हस्ते झाले.

या संस्थेतून 15 हजार डॉक्टर तयार झाले. देशात आणि परदेशात आरोग्य सेवा पुरविणाऱ्या येथून डॉक्टर बनलेल्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात आपले नाव गाजवले. 17 विद्यार्थ्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार मिळाले. 18 आयएएस, आयपीएस अधिकारी झाले. 7 विद्यार्थांना डॉ. बी. सी. रॉय पुरस्कार मिळाला. दोघांना रोमन मॅगसेसे पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. 8 आमदार, खासदार आणि मंत्री झाले आहेत. 55 भारतीय सशस्त्र दलात उच्च पदांवर अधिकारी बनले आहेत.

महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

अमृत महोत्सवानिमित्त विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाची सांगता 23 डिसेंबर रोजी होणार आहे. यावेळी माजी व वर्तमान विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम होणार आहेत. उच्च पदावर असलेल्या माजी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित केले जाईल.

514 कोटींचा निधी मंजूर

अमृत महोत्सवाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संस्थेसाठी 514 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी विविध विकासकामांसाठी वापरला जाणार आहे. यावेळी डॉ. उदय नारलावार, डॉ. देवेंद्र माहुरे, डॉ. सुधीर नेरळ, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. अविनाश घोडे, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. विकी रुघवानी, डॉ. महू गौर, डॉ. सुमेध चौधरी आदी उपस्थित होते.