नागपूर (Nagpur) : केळवद आणि रायबासा या दोन मोठ्या गावांना जोडणारा इंग्रजांच्या काळातील पूल जीर्ण झाला आहे. या पुलाने शंभरी गाठली असून त्यावरून सतत जड वाहनांची वाहतूक सुरू असते. गरज असतानाही पुलाची दुरुस्ती न केल्याने पुराच्या तडाख्याने कधीही कोसळण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सावनेर तालुक्यातील पंधरा हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या केळवद आणि रायवासा या दोन गावाला जोडणारा एकमेव ब्रिटिशकालीन पूल मागील शंभर वर्षांपासून सेवा देत आहे. आता पूल जीर्ण झाला आहे. पुलावरील दगड उघडे पडले आहेत. दोन्ही बाजूला कठडे नसल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन त्यावरून जावे लागते. पावसाळ्यात पूर आल्यानंतर दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने पुराचे पाणी उतरेपर्यंत प्रतिक्षा करावी लागते. काही वर्षापूर्वी नवीन पुलाच्या बांधकामाचा खर्च लाखांत होता. आता या पुलासाठी कोट्यवधी रुपये खर्च होणार आहेत.
मजबूत पुलाची आवश्यकता
केळवद ऐतिहासिक गाव असून येथे कपिलेश्वर हे तीर्थस्थळ आहे. बाजारपेठेचे गाव असल्याने दहा ते बारा खेड्यांचा थेट संपर्क असतो. गावात पोलिस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, राष्ट्रीय बँक आदींसह जिल्हा परिषद शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे पुलावरून सतत वाहतूक सुरू असते. त्यामुळे दोन्ही गावांना जोडण्यासाठी उंच आणि मजबूत पुलाची गरज असल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
इंग्रजांनी पाठविले होते पत्र
पुलाला शंभर वर्षे झाल्याने त्याची मुदत संपली आहे. यासंदर्भात ब्रिटिशांनी 1984 मध्ये राज्य शासनाला पत्र पाठविले आहे. पण याची दखल घेण्यात आली नसून, पुलावरून जड वाहतूक सुरू आहे.
जीर्ण पुलाच्या नव्याने बांधकामासाठी लागणारा या तीन कोटी रुपयांचा विषय राज्य शासनाचा अखत्यारीतील आहे. डागडुजीसाठी दोन लाख मंजूर केले असून काम सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदच्या माजी उपाध्यक्षा सुमित्रा मनोहर कुंभारे यांनी दिली.
गेल्या पाच वर्षांत नवीन पुलासाठी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना दोनदा प्रस्ताव दिले पण स्थानिक आमदारांची मंजुरी आणण्यास सांगितले. आता नव्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे केळवदच्या प्रभारी सरपंच गीतांजली वानखेडे यांनी सांगितले.