Ajni Railway Station Tendernama
विदर्भ

Nagpur : 4 महिने अगोदरच पूर्ण होणार 'या' वर्ल्ड क्लास स्टेशनचे 297 कोटींचे काम

टेंडरनामा ब्युरो

Nagpur नागपूर : महाराष्ट्रातील नागपूरमधील अजनी रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास नियोजित वेळेच्या चार महिने आधी पूर्ण होण्याची माहिती रेल्वे प्रशासना कडून समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे सॅटेलाइट स्टेशन म्हणून काम करणारे अजनी स्टेशन हे महत्त्वाचे स्टेशन आहे.

वर्ल्ड क्लास दर्जाच्या सोयीसुविधा आणि तशाच प्रकारची आकर्षक वास्तू डिझाइन झालेले अजनी रेल्वे स्टेशनचे काम प्रगतिपथावर आहे. 297 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद असलेल्या या प्रकल्पाला नियोजित मुदतीपेक्षा चार महिने अगोदरच पूर्ण करण्याची तयारी रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने दाखविली आहे. 

मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात येणारे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण रेल्वे स्टेशन म्हणून अजनी स्टेशनचे नाव असून, येथून देशाच्या विविध भागांत रेल्वेगाड्यांचे आवागमन होते. देशातील विविध रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकास योजनेअंतर्गत अजनी स्टेशनला सॅटेलाइट स्टेशनच्या रुपात विकसित केले जात आहे.

काम पूर्ण झाल्यानंतर दररोज 45 हजार प्रवासी अजनी स्टेशनवरून आवागमन करू शकतील. येथे प्रवाशांना उच्च दर्जाच्या सोयीसुविधा देण्याचे नियोजन असून वृद्ध, दिव्यांग प्रवाशांना अनुकूल अशा सुविधा मिळणार आहेत. त्यासंबंधाने स्टेशनच्या पुनर्विकासाशी संबंधित कामे केली जात आहेत.

येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांसाठी तब्बल 10 मीटर रुंदीचे दोन एफबीओ बांधले जाणार आहेत. त्याला ट्रॅव्हलेटर्स संलग्न राहणार आहेत. प्रत्येक प्लॅटफॉर्मला एस्केलेटर, लिफ्ट आणि जिना असेल. ऑटो, कार, टॅक्सीसाठी 3679 चौरस मीटरची प्रशस्त पार्किंग राहणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी ड्रॉप आणि पिकअप झोन वेगळे राहणार आहे. येथे पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांना स्थानकाची प्रशस्त इमारत बांधण्याचे काम सुरू आहे.

फलाटाच्या बांधकामाचीही तयारी सुरू असून, प्रवाशांना अडचणीचे होऊ नये म्हणून सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. आतापर्यंत 30 टक्के काम पूर्ण झाले आहे. 

हे काम पूर्ण करण्याचा नियोजित अवधी जानेवारी 2026 चा आहे. मात्र, आम्ही हे काम चार महिने आधीच अर्थात सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण करू, असा विश्वास आरएलडीएने व्यक्त केला आहे.