नागपूर (Nagpur) : शहराच्या वैभवात आता आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्राची भर पडणार आहे. हे केंद्र स्थापना करण्याच्या निर्णयास राज्याच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, या प्रकल्पाकरिता सुमारे 228 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत नागपूर येथील कृषी महाविद्यालयाच्या दाभा येथील जागेवर हे आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. याकरिता 32 हेक्टर जागा घेण्यात येणार आहे. या केंद्रात तब्बल साडेतीन हजार आसन क्षमतेचे शेतकरी प्रशिक्षण सभागृह, इनडोअर ॲग्रीकल्चर म्युझियम, मनोरंजन केंद्र, पिक कॅफेटेरिया, शेतकरी वसतिगृह, कृषी प्रेरणा केंद्र, आंतराष्ट्रीय कृषी तज्ज्ञांचे मॉडेल आदी सुविधांचा समावेश राहणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या केंद्राची घोषणा केली होती. पंजाबराव देशमुख विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रकाश कडू यांनी या केंद्राचा प्रस्ताव तयार केला होता. ज्या जागेवर हे केंद्र उभारले जाणार आहे त्या जागेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अॅग्रोव्हिजन हे प्रदर्शन भरवले होते.
आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्राच्या माध्यमातून अत्याधुनिक कृषी चवळवळीला आणखी गती मिळणार आहे. कृषी सुविधा केंद्रामुळे आता विकासाला अधिक गती मिळणार आहे. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून हा माल मुंबईपर्यंत जलदगतीने पोहचविला जाईल. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच विदर्भाच्या अर्थचक्राला गती मिळणार आहे.
1 हजार एकरावर लॉजिस्टिक हब
शहराच्या विकासासाठी स्थापन केलेल्या नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणने लॉजिस्टिक झोन म्हणून अमरावती रोडवरील गोंडखैरी, पेंढरीसह तीन गावांच्या परिसरात सुमारे एक हजार एकर जमीन राखीव ठेवली आहे. याच परिसरात लॉजिस्टिक हब उभारला जाण्याची शक्यता आहे. या हबमध्ये वेअर हाऊस व मल्टिमॉडेल पार्क उभारले जातील. नागपूरसह पूर्व विदर्भातील कारखान्यांमध्ये उत्पादित होणारा माल येथे साठवला जाईल.