Mahavitran Tendernama
विदर्भ

Amravati : ...तर परिवारासह आत्महत्या करणार; MSEDCL मीटर रिडर कंत्राटी कामगार संघटनेची चेतावनी

टेंडरनामा ब्युरो

अमरावती (Amravati) : महावितरणने मीटर रीडर कामगारांना कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध करून देत न्याय द्यावा किंवा कामगार व त्यांच्या परिवारास आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी एमएसईडीसीएल मीटर रिडर कंत्राटी कामगार संघटनेने अमरावतीच्या जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले तसेच यासमस्या संदर्भात चर्चा केली.

महावितरणकडून राज्यातील सुमारे 2 कोटी 25 लाख 65 हजार वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहेत. वीज कामगारांना विश्वासात न घेता कंपनी व्यवस्थापनाने परस्पर निर्णय घेतल्याने मीटर रीडिंग घेणारे मीटर रिडर्स, वीज बिल प्रणाली सांभाळणारे, बिलिंग विभागातील सर्व कर्मचारी, विजेची देयके घेणारे, बिलाचे वाटप करणारे, वीजबिल वसुली करणारे, वीजपुरवठा खंडित करणारे, असे सुमारे 20 हजारांहून अधिक कामगार कायमस्वरूपी बेरोजगार होणार आहेत, असे सांगत महावितरणला परिवार समजून आम्ही व आमच्या कर्मचार्‍यांनी वर्षानुवर्षे सेवा दिली. आताही नवीन तंत्रज्ञानाला आमचा विरोध नाही, परंतु महावितरणने आमच्या कर्मचार्‍यांना विविध पद्धतीने सेवेत समावून घ्यावे, अशी मागणी मीटर रिडर कंत्राटी कामगार संघटनेने केली आहे.

कोरोनासारख्या महामारीत आणि तिन्ही ऋतूंमध्ये जीवाची परवा न करता मीटर रीडिंग तसेच बिल वाटपाचे काम आतापर्यंत योग्य पद्धतीने कोणतीही तक्रार न करता या कामगारांनी केले आहे. विशेष म्हणजे मीटर रीडर कामगारांना कोणत्याही प्रकारचे लाभ व सुविधा कंत्राटदारामार्फत मिळत नाही. असे असताना सुद्धा अत्यल्प मानधनावर कामगार काम करीत आहे. परंतु घरोघरी लावण्यात येणार्‍या स्मार्ट मीटरमुळे महाराष्ट्रातील मीटर रिडींगचे काम करणार्‍या अंदाजे 20 हजार मीटर रीडर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता महावितरणने मीटर रीडर कामगारांना कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध करून देत न्याय द्यावा किंवा कामगार व त्यांच्या परिवारास आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी एमएसईडीसीएल मीटर रिडर कंत्राटी कामगार संघटनेने अमरावतीच्या जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले तसेच या समस्या संदर्भात चर्चा केली.