Mnerga Tendernam
विदर्भ

Wardha : लाभार्थ्यांना 98.85 कोटी वितरित; मनरेगा देतेय विहीरीसाठी अनुदान

टेंडरनामा ब्युरो

वर्धा (Wardha) : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या हेतूने शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन विहिरीसाठी लाभार्थीना अनुदान देण्यात येते. पूर्वी हे अनुदान तीन लाख इतके होते. तर 4 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये एवढे अनुदान निश्चित करण्यात आले आहे. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात 8 हजार 430 विहिरींचे काम पूर्ण झाले असून, या लाभार्थीना एकूण 98 कोटी 85 लाख 31 हजारांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

अर्जासोबत कुठली कागदपत्रे जोडावयाची?

सातबाराचा ऑनलाइन उतारा, आठ-अ चा ऑनलाइन उतारा, मनरेगा जॉब कार्डची प्रत, सामुदायिक विहीर घ्यायची असल्यास सर्वजण मिळून 40 गुंठे जमीन सलग असल्याचा पंचनामा आणि समोपचाराने पाणी वापरा बाबतचे सर्वांचे करारपत्र.

पात्रता काय असणार -

अर्जदाराकडे 1 एकर शेतजमीन सलग असावी. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून 500 मीटरपेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहीर खोदता येईल. दोन विहिरींमध्ये 150 मीटर अंतराची अट अनुसूचित जाती-जमाती, दारि- द्रयरेषेखालील कुटुंबांसाठी लागू नाही. शिवाय खासगी विहिरीपासून 150 मीटर अंतराची अट लागू राहणार नाही. लाभधारकांच्या सातबाऱ्यावर याआधीच विहिरीची नोंद असू नये. एकूण क्षेत्राचा दाखला, म्हणजे आठ-अ उतारा असावा. एकापेक्षा जास्त शेतकरी विहीर घेऊ शकतील, एकूण जमिनीचे सलग क्षेत्र 1 एकरपेक्षा जास्त असावे. अर्जदार हा जॉब कार्डधारक असावा.

कुणाला घेता येतो योजनेचा लाभ?

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दारिद्रयरेषेखालील लाभार्थी, स्त्री-कर्ता असलेले कुटुंब, दिव्यांग व्यक्ती कर्ता असलेले कुटुंब, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, सीमांत शेतकरी (2.5 एकरपर्यंत शेतजमीन), अल्पभूधारक शेतकरी (5 एकरपर्यंत शेतजमीन) यांना मनरेगाअंतर्गत सिंचन विहिरीसाठी चार लाखांचे अनुदान दिले जात असल्याचे सांगण्यात आले.

अर्ज कुठे कराल?

मनरेगाअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीसाठी ग्रामपंचाय- तीकडे अर्ज करता येतो. शासनाने अर्जाचा नमुना जाहीर केला असून, त्यात आवश्यक माहिती नमूद करीत आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत संलग्न करणे क्रमप्राप्त आहे. शासन शेतकऱ्यांच्या हितार्थ अनेक योजना राबवत आहे. त्यापैकी एक मनरेगाअंतर्गत सिंचन विहीर योजना आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 430 विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. या लाभार्थीना एकूण 98.85 कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. अशी माहिती रोहयो, वर्धा च्या उपजिल्हाधिकारी प्रियंका पवार-कर्डिले यांनी दिली.