गोंदिया (Gondia) : देवरी महाराष्ट्रातील आदिवासी भागातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात आहे. शबरी घरकुल योजनेत ज्या व्यक्तींचे ड यादीत नाव असून जे पात्र आहेत अशा सर्व आदिवासी बांधवांना येत्या मार्च अखेर घरे देणार असल्याचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी सांगितले.
स्थानिक गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार अशोक नेते, माजी आमदार संजय पुराम, संघटनमंत्री वीरेंद्र अंजनकर, भरतसिंग दुधनाग, पं. स. सभापती अंबिका बंजार नगराध्यक्ष संजू उईके, उपाध्यक्ष प्रज्ञा सांगिडवार, जि. प. सदस्या कल्पना होईल वालोदे, झामसिंग येरणे, महेश जैन, प्रवीण दहीकर, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, अनिल येरणे उपस्थित होते. गावित म्हणाले, शासनाने बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेला मंजुरी दिली असून सर्व आदिवासी भागातील रस्ते बारमाही करण्यात येणार आहे. वस्त्या पाडे हे मुख्य रस्त्याला जोडण्याचे काम या योजनेमुळे होणार आहे.
आदिवासी मांडले बांधवांपर्यंत आरोग्यासह इतर सेवा सर्व पोहोचण्यासाठी मदत होईल. यामुळे कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यात मदत होईल. हा रस्ते प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. आदिवासी वस्ती वाड्यातील समस्या या प्रकल्पामुळे दूर होऊन विकासाला चालना मिळणार असल्याचे गावित यांनी सांगितले. यावेळी आदिवासी सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण गावित यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी . कार्यक्रमात आदिवासी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आश्रमशाळेचे विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
सांस्कृतिक भवन बांधकामासाठी निधीत वाढ
ग्रामीण भागात 2 कोटीचे तर तालुक्याच्या ठिकाणी 4 कोटी रुपयांचे आदिवासी सांस्कृतिक भवन तयार करण्यात येणार असल्याचे गावित यांनी सांगितले. यावेळी अशोक नेते यांनी क्षेत्राच्या विकासासाठी आदिवासी मंत्री यांना निधी देण्याची मागणी केली.