Nitin Gadkari Tendernama
विदर्भ

भारताचा वाहन उद्योग 50 लाख कोटींपर्यंत न्यायचा आहे; असे का म्हणाले गडकरी?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : मोठी अर्थव्यवस्था व्हायचे असेल तर उत्पादनांची निर्मिती आपल्याकडेच व्हावी लागेल. आणि एक्सपोर्ट वाढवावे लागेल. रोजगार निर्मिती करणाऱ्यांसाठी रेड कार्पेट अंथरावे लागेल. रोजगार निर्माण होईल तर गरीबी दूर होईल. चीनच्या तुलनेत निर्मिती वाढवावी लागेल आणि उत्पादन खर्च कमी करावा लागेल. आज वाहन उद्योगात आपण चीन पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आहोत. त्यामुळे चीनसोबत स्पर्धा करण्याची क्षमता भारतामध्ये नक्कीच आहे,’ असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला.

डॉ. दंदे फाउंडेशन आणि राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात ‘मेड इन चायना’ या पुस्तकाचा प्रकाशन नितिन गडकरी यांनी केले.  नितीन गडकरी यांनी सांगितले की, भारताचा ऑटोमोबाईल उद्योग 16 लाख कोटींचा झाला आहे. 15 दिवसांपूर्वी त्यांनी बजाजच्या सीएनजी बाईक चे लोकार्पण केले. पेट्रोलच्या तुलनेत कमी खर्च आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या चीन आणि तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. आधी आपण चौथ्या आणि जपान तिसऱ्या क्रमांकावर होता. गेल्या दहा वर्षात आपण जपानला मागे टाकले. आणि आता भारताचा वाहन उद्योग 50 लाख कोटींपर्यंत न्यायचा आहे,’ असेही गडकरी म्हणाले.

भारताला रोजगार निर्माण करणारी आणि आर्थिक सामाजिक विषमता दूर करणाऱ्या अर्थव्यवस्थेची गरज आहे. इम्पोर्ट कमी करून एक्सपोर्ट वाढवू तेव्हा अर्थव्यवस्था उत्तम होईल. त्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले. चीनमधील परिस्थिती वेगाने बदलत आहे. तिथे मंदीचे वातावरण आहे. अनेक कंपन्या बंद झाल्या आणि अनेक  बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कोविडनंतर जगातील अनेक देश चीनसोबत व्यवसाय करण्याच्या मन:स्थितीत नाहीत. पण त्याचवेळी जगाला आवश्यक असलेले तंत्रज्ञान आणि यंत्राची निर्मिती करण्यात चीन आघाडीवर आहे हे विसरून चालणार नाही, असेही ते म्हणाले. 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा समाजवाद, साम्यवाद आणि पुंजीवाद मोठ्या प्रमाणात होता. चीनमध्ये आज लाल झेंडा सोडला तर कम्युनिस्ट पार्टी कुठेच दिसत नाही. ते म्हणतात नॅशनल इंटरेस्ट वेगळा विषय आहे. त्यांनी सगळे विचार बाजूला ठेवले. सर्वसामान्यांना सुध्दा विकासाभिमुख, रोजगाराभिमुख मानसिकता ठेवावी लागेल. कम्युनिस्ट विचारधारा सोडून चीनने आपले आर्थिक मॉडेल तयार केले,’ याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.