नागपूर (Nagpur) : १० वर्षांपासून चोवीस तास पाणी देण्यासाठी कामेच सुरू आहेत. ती केव्हा पूर्ण करणार आणि शहराला चोवीस तास पाणी केव्हा देणार अशी विचारणा करून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ओसीडब्ल्यू कंपनीला चांगलेच खडसावले. सोबतच महापालिका आयुक्तांना या कंपनीचे ऑडिट करण्याचे निर्देश दिले.
शहराला पेंच आणि कन्हानमधून येथून पाणी पुरवठा केला जातो. दोन्ही जलाशहांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध आहेत. असे असताना अनेक वस्त्यांना टंंचाईचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रार केल्यानंतरही त्याची दखल घेतल्या जात नाही. सध्या महापालिका बरखास्त झाली आहे. त्यामुळे कोणाचाच वचक राहिला नाही. ही संधी साधून ओसीडब्ल्यू कंपनीची मनमानी सुरू आहे. पाणी वितरणाचे वेळापत्रक पाळले जात नाही. नळ येईल का नाही काहीच शाश्वती राहिली नाही. याची दखल घेत नितीन गडकरी यांनी सर्व अधिकाऱ्यांना आपल्या घरी बोलावून चांगलीच खरडपट्टी काढली. महापालिका आयुक्त, ओसीडब्ल्यू कंपनीचे अधिकारी, महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचे अधिकारी या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते.
गेल्या 10 वर्षांपासून 24 बाय 7 योजना तुमच्यामुळे यशस्वी होऊ शकली नाही. त्याची कारणे काय? शहरातील एकही भागाला 24 बाय 7 पाणीपुरवठा होऊ शकला नाही. प्रायोगिक स्तरावर एका झोनमध्ये ही योजना राबविली पण तेथेही 24 तास पाणी नाही. केवळ कंपनीच्या नकारार्थी भूमिकेमुळे व लोकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. कंपनीच्या कामात सुधारणा झाली नाही तर तुमचे कंत्राट रद्द करावे लागेल, असा इशाराही ना. गडकरी यांनी दिला.
संपूर्ण शहरात 24 बाय 7 योजना कधी लागू होईल याची तारीख आणि योजना राबविण्याचा संपूर्ण कार्यक्रम मला द्या. लोक बिल वेळेवर भरतात. त्यांना पाणी मिळत नाही, यासाठी कंपनी जबाबदार आहे. जुन्या इमारतीत पाणीवितरणाची आणि टाक्यांमधील पाण्याची पातळी दाखविणारे स्काडा स्क्रीन का बंद करण्यात आले, त्याची सबळ कारण देण्याचे आदेश गडकरी यांनी दिले.