Mid Day Meal Tendernama
विदर्भ

Mid Day Mealसंदर्भात मोठा निर्णय; यामुळे वाढले ठेकेदारांचे टेन्शन

Ashok Jawale

नागपूर (Nagpur) : शाळांमधून मुलांना (School Students) देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचे (Mid Day Meal) सोशल ऑडिट करण्यात येणार आहे. यामुळे पोषण आहाराचा नेमका फायदा किती, कोणाला आणि कसा होतो हे तपासल्या जाणार असल्याने अनेक ठेकेदारांचे (Contractors) धाबे दणाणले आहे.

पहिली ते आठवीच्या शाळाकरी मुलांना पोषण आहार देण्यात येते. मुलांना शाळेत येण्याची ओढ निर्माण व्हावी, त्याच प्रमाणे त्यांचे आरोग्य चांगले राहावे, या दृष्टिकोनातून ही योजना सुरू करण्यात आली. परंतु या आहाराबाबत अनेकदा प्रश्न निर्माण करण्यात आले. आहारातून मुलांऐवजी कंत्राटदाराचे पोषण होत असल्याचा आरोप झालेत. मुलांना पूर्ण आहार मिळत नसल्याच्याही तक्रारी झाल्यात.

आहारात अनेकदा बदलही करण्यात आलेत. या आहारामुळे नेमका विद्यार्थ्यांना कोणता फायदा होत आहे, त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होत आहे, याची तपासणी करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून एका संस्थेला याचे कामे देण्यात आली आहेत. या संस्थेकडून जनसुनावणीही घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. ही सुनावणी राज्यातील १९ जिल्ह्यात होईल. नागपूर शहरसह संपूर्ण तालुक्यातील काही शाळांमध्ये हे ऑडिट करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे नागपूर शहरात पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या काही कंत्राटदारांचे ट्रक जप्त करण्यात आले होते. पोषण आहारासाठी मिळालेले धान्य बाजारात विक्रीसाठी नेले जात होते. त्यानंतरही काही कंत्राटदारांवर कारवाईच बडगा उगारण्यात आला होता. मात्र हे प्रकरण सध्या थंडबस्त्यात गेले आहे.

महापालिकेने पोषण आहाराचे कंत्राट देताना सर्सपणे नियमांचे उल्लंघन केले होते. एकाच ठेकेदाराच्या वेगवेगळ्या नावाने असलेल्या संस्थांना पुरवठ्याचे कंत्राट दिले आहे. सर्व संस्थांचा पत्ता एकच असल्याचेही आढळून आले होते. बडे व्यापारी आणि राजकीय कार्यकर्ते यात अडकले असल्याने कारवाई होताना दिसत नाही.