Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : 47 ग्रामपंचायतींमध्ये 'रोहयो'ची कामे ठप्प कारण...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (रोहयो) अंतर्गत ग्रामपंचायतस्तरावरील कामांवर गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांनी बहिष्कार असल्याने कामठी तालुक्यातील 47 ग्रामपंचायतींच्या स्तरावरील 'रोहयो' ची कामे ठप्प झाली आहेत.

ग्रामीण भागातील मजुरांसाठी संजीवनी असलेली रोजगार हमी योजना यावर्षी आचक्या देत आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात यावर्षी रोजगार हमी योजनेची कामे सुरू झाली नाही. काही ठिकाणी झाली तर ती नाहीच्या बरोबर होती. मजुरांवर एकप्रकारे आर्थिक संकट कोसळले होते. अधिकाऱ्यांवर येणार ताण आणि जबाबदारीचे ओझे उचलण्याची इच्छा नसल्याने यावर बहिष्कार टाकण्यात आला. अधिकाऱ्यांच्या असहकार आंदोलनात गेल्या महिनाभरापासून ग्रामपंचायतस्तरावरील 'रोहयो'ची कामे अडकली आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायती आणि विविध शासकीय यंत्रणांमार्फत कामे केली जातात. त्यामध्ये ग्रामपंचायतींच्या स्तरावरील मोठ्या प्रमाणात कामे करण्यात येतात.

कामांची अंमलबजावणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमार्फत केली जाते; परंतु पंचायत समितींचे गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी आदींसह महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकाऱ्यांनी गेल्या 10 एप्रिलपासून 'रोहयो' च्या कामांवर बहिष्कार टाकत असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्यामध्ये 'रोहयो कामांच्या मजुरी मस्टरवर स्वाक्षरीसह नवीन कामांना मंजुरी देण्याची प्रक्रिया ठप्प असल्याने, संबंधित अधिकाऱ्याच्या असहकार आंदोलनात गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील रोहयोची विविध कामे बंद आहेत. महिनाभराचा कालावधी उलटून जात असला तरी तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीमधील मजुरांना यावर्षी कामे मिळाली नाहीत. यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

पाणंद रस्त्यांसह विविध कामे बंद

तालुक्यात गेल्या 11 एप्रिलपासून ग्रामपंचायत स्तरावरील रोहयोची कामे ठप्प आहेत. त्यामध्ये घरकुल, मातोश्री शेतपाणंद रस्ते कामांसह सिंचन विहीर, विहिरींचे पुनर्भरण, शोषखड्डे, वृक्षसंगोपण, गुरांचे गोठे, चंदन लागवड, शेळी व कुक्कुटपालन शेड आदी कामे ठप्प आहेत.