MahaMetro Tendernama
विदर्भ

मेट्रोच्या प्रवाशांना कनेक्टिव्हिटीकरता ‘स्टॅम्प’; काय आहे हे?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : मेट्रोचा प्रवास सहज, सोपा होण्याकरीता महामेट्रो (MahaMetro) विविध उपक्रम राबवित आहे. प्रवाशांना घरापासून तर त्यांच्या कार्यालयांपर्यंत व्हाया मेट्रोतून सुखकर प्रवासासाठी स्टेशन ॲक्सेस ॲंड मोबिलिटी प्रोग्राम (STAMP) राबविण्यास सुरवात करण्यात आली. यासाठी विविध संस्थांनाही प्रोत्साहित केले जात असून, प्रवाशांना मेट्रो स्थानकावरून कनेक्टिव्हिटी देण्यासाठी दोन संस्थांची निवड करण्यात आली आहे.

स्टॅम्प या उपक्रमांतर्गत मेट्रोची सेवा उत्तम करण्यावर महामेट्रोने भर दिला आहे. टोयोटा मोबिलिटी फाउंडेशन (टीएमएफ) आणि वर्ल्ड रिसोर्सेज इंस्टिट्यूट इंडियाच्या (डब्ल्यूआरआई इंडिया) सहकार्याने हा उपक्रम महामेट्रोच्या नेतृत्त्वात राबविण्यात येत आहे. मार्चमध्ये ‘स्टॅम्प’ उपक्रम सुरू केल्यानंतर, संपूर्ण देशातील २५ पेक्षा जास्त मोबिलिटी कंपन्यांनी विविध मेट्रो स्टेशनवर सेवा देण्यासाठी विविध वाहनांचा प्रस्ताव अर्ज दाखल केला. यातील सहा संस्थांना महामेट्रोने आमंत्रित केले गेले. महामेट्रो आणि क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच डब्ल्यूआरआई इंडियाच्या प्रतिनिधीच्या माध्यमाने सर्वच प्रस्तावांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानुसार क्यूवायके बाइक आणि जीरो-२१ या दोन संस्थांची मेट्रो स्टेशनवर परिवहन सेवा देण्याकरता निवड करण्यात आली. या दोन संस्थांना निवडक मेट्रोस्थानकांवर आपली वाहने ठेवण्याची संधी मिळणार आहे.

‘स्टॅम्प’ उपक्रमाच्या माध्यमाने नागपुरातील प्रवाशांना येथील परिवहन सेवेचा लाभ मिळावा, असा प्रयत्न महामेट्रो करीत आहे. या दोन कंपन्यांच्या माध्यमाने नागपुरात उपयुक्त आणि सर्व समावेशक वाहतूक व्यवस्था देण्याचा प्रयत्न असल्याचे महामेट्रोचे कार्यकारी संचालक उदय बोरवणकर यांनी उपक्रमासंबंधी बोलताना सांगितले. या उपक्रमांच्या माध्यमातून शास्त्रीय पद्धतीने माहिती एकत्रित केली जाते. या सर्व माहितीचा नागपूर मेट्रो आणि इतर प्रकल्पांना परिवहनाच्या विविध साधनांचे एकत्रीकरणातून एक उपयुक्त वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल, असे डब्ल्यूआरआई इंडिया रॉस सेंटरचे कार्यकारी संचालक माधव पै यांनी सांगितले.