Nagpur Tendernama
विदर्भ

Chandrapur : इमारत झाली पण मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल कधी होणार सुरु? फर्निचर, मशीनसाठी 100 कोटींची गरज

टेंडरनामा ब्युरो

चंद्रपूर (Chandrapur) : चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यासाठी न्यायालयात सुद्धा जावे लागले. म्हणूनच चंद्रपूरसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महाविद्यालयाची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. मात्र आता फर्निचर व यंत्रसामग्रीसाठी वेळेवर निधी न मिळाल्याने नवीन इमारत कधी पूर्ण होणार याबाबत काहीच सांगता येत नाही.

महाविद्यालय प्रशासनाने फर्निचर व यंत्रसामग्रीसाठी सुमारे 100 कोटी रुपयांचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला असून हा प्रस्ताव सध्या सचिव स्तरावर प्रलंबित आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेपासूनच अनेक अडचणींचा सामना करत आहे. या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी शासनाविरोधात न्यायालयात तक्रार करावी लागली. त्यानंतरच सरकारने कॉलेजला मान्यता दिली. हे महाविद्यालय जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरु आहे. तर महिला रुग्णालयाच्या इमारतीत महाविद्यालयाचे प्रशासन आणि वसतिगृह आहे. महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या जागेबाबतही मोठा वाद निर्माण झाला होता. पागलबाबानगरमध्ये 50 एकर जमीन निश्चित केली गेली आहे. गेल्या 8 वर्षांपासून महाविद्यालयाचे काम सुरू आहे. कोरोनाच्या काळात काम बंद होते. वास्तू उभारण्यात आली, मात्र दरम्यानच्या काळात वीज आणि पाणी पुरवठ्यासाठी निधी उपलब्ध नव्हता. यासाठी सुद्धा खूप प्रयत्न करावे लागले. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर निधी मंजूर झाल्याने वीज व पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला. आता फर्निचर आणि यंत्रसामग्रीसाठी 100 कोटी रुपयांची गरज आहे.

फर्निचरसाठी 57 कोटी आणि विविध विभागातील यंत्रसामग्रीसाठी 42 कोटी रुपयांचा प्रस्ताव 4 महिन्यांपूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव सध्या विभागाच्या सचिवांकडे प्रलंबित आहे. जर एक महिन्याच्या आत पैसे न मिळाल्यास विधानसभेच्या आचारसंहितेमुळे पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे. निधी उपलब्ध झाला तरच डिसेंबरपर्यंत नवीन इमारतीत कॉलेज सुरू करता येईल. निधीसाठी राजकीय प्रयास कमी पडत असल्याचे बोलले जात आहे. चंद्रपूरसह अन्य काही जिल्ह्यांमध्येही वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली. तेथील महाविद्यालयाला निधीची कोणतीही अडचण आली नाही. स्थानिक राजकीय नेत्यांनी विकासात भूमिका बजावली आणि सरकारकडून निधी मिळवला. मात्र चंद्रपुरात तसे होताना दिसत नाही. निवासी डॉक्टरांसाठी वसतिगृह नाही. आता निवासी डॉक्टरांना वसतिगृहात राहायचे नाही, कारण वसतिगृहातील काही डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली आहे. नवीन ठिकाणी राहण्याची व्यवस्था न केल्यास काम बंद करण्याची धमकी डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांना नव्या इमारतीत 'शिफ्ट' करण्यात येणार आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभावामुळे निधी येण्यात उशीर होत आहे, अशी चर्चा जिल्ह्यात होत आहे.